शिवसैनिकांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:22 AM2020-12-23T04:22:58+5:302020-12-23T04:22:58+5:30
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मंगळवारी शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी देसाई बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, नितीन बानुगडे-पाटील, माजी ...
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मंगळवारी शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी देसाई बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, नितीन बानुगडे-पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, हरिदास लेंगरे, महिला आघाडीप्रमुख सुवर्णा माेहिते, सुनीता माेरे, सुजाता इंगळे, शोभाताई गावडे आदी उपस्थित होते.
शंभुराज देसाई म्हणाले, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अर्ज दाखल करावेत. प्रत्येक गावांमध्ये पक्षाची मजबूत बांधणी करण्याची मोठी संधी आहे. याचा पुढील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत फायदा होणार आहे. पक्ष वाढविताना शिवसैनिकांना कोण मुद्दाम त्रास देत असतील, तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. अनिल बाबर, अजितराव घोरपडे हे दिग्गज नेते पक्षात असून, त्यांच्या अनुभवाचा शिवसैनिकांनी फायदा करून घ्यावा.
नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ग्रामपंचायतींवर भगवाच फडकला पाहिजे, या जिद्दीने काम करा. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेशिवाय भाजप शून्य आहे, हेच सिध्द झाले आहे. शिवसेना बरोबर असेल तर काय होते, याचा महाविकास आघाडीने अनुभव घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवायचाच या जिद्दीने निवडणुका लढवाव्यात.
चौकट
कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करा : घोरपडे
ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी असणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. तो नेत्यांनी दूर केला पाहिजे. भाजपचे नटबोल्ट तर खिळखिळे झाले आहेतच. ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांच्या विरोधातच होणार आहेत. यावरही पक्षप्रमुखांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केले.
चौकट
बिनविरोधसाठी विचार करा : बाबर
ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी असल्यामुळे बहुतांशी बिनविरोध ग्रामपंचायती करून तेथे शिरकाव केला पाहिजे. परिस्थितीनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भूमिका बदलली पाहिजे, असे मत बाबर यांनी व्यक्त केले.