महापालिकेकडून एक्झिबिशन सेंटरसाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:32 AM2021-09-08T04:32:28+5:302021-09-08T04:32:28+5:30
ओळ - इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष जितेंद्र कोळसे यांचा सत्कार आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रमोद ...
ओळ - इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष जितेंद्र कोळसे यांचा सत्कार आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रमोद चौगुले, शीतल शहा, प्रमोद शिंदे, केदार टाकवेकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली शहराचे स्वरूप बदलण्यात इंजिनिअर्स आणि आर्किटेक्टचा मोठा वाटा आहे. असोसिएशनने पुढाकार घेतला, तर महापालिका आणि असोसिएशन मिळून सांगलीत एक चांगले एक्झिबिशन सेंटर उभारण्यावर विचार करू, असे प्रतिपादन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले.
इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयुक्त कापडणीस बोलत होते. त्यांच्याहस्ते नूतन अध्यक्ष जितेंद्र कोळसे, उपाध्यक्ष केदार टाकवेकर, सचिव पंजाब मोरे यांच्यासह पदाधिकारी, समन्वयक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद चौगुले, शीतल शहा, प्रमोद शिंदे उपस्थित होते.
कापडणीस म्हणाले, काळ्या खणीच्या सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. वि. स. खांडेकर अभ्यासिका अत्याधुनिक केली आहे. आयुर्वेदिक दवाखानाही सुरू करत आहोत. महापालिकेच्या विविध सेवा ऑनलाईन सुरू केल्या आहेत. वारणाली व कुपवाडमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. असोसिएशनने पुढाकार घेतला, तर महापालिका आणि असोसिएशन एकत्र येऊन सांगलीकरांसाठी एक्झिबिशन सेंटर उभारण्याचा विचार करता येईल.
असोसिएशनचे ट्रस्टी प्रमोद परीख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमास एस. पी. तायवाडे-पाटील, मुकुल परीख, रणदीप मोरे, वाय. के. पाटील उपस्थित होते.