आम्ही काम करतो, केवळ फोटो काढत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:30 AM2021-05-25T04:30:34+5:302021-05-25T04:30:34+5:30
सांगली : प्रभाग १७ मधील ड्रेनेज योजनेची कामे आम्ही मंजूर केली आहेत. आम्ही काम करतो, नुसते फोटो काढून सोशल ...
सांगली : प्रभाग १७ मधील ड्रेनेज योजनेची कामे आम्ही मंजूर केली आहेत. आम्ही काम करतो, नुसते फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करीत नाही. ड्रेनेजची कामे मंजूर केल्याचे पुरावे भाजप नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी द्यावेत, असे आव्हान महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी दिले.
मंगलमूर्ती काॅलनी परिसरातील ड्रेनेज योजनेच्या कामावरून महापौर सूर्यवंशी व नवलाई यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. दोन दिवसांपूर्वी नवलाई यांनी या कामाचे श्रेय लाटू नये, असा टोला लगावला होता. त्याला प्रत्युत्तर देताना महापौर सूर्यवंशी म्हणाले की, १९९८ पासून पंधरा वर्षे नवलाई नगरसेवक होते. मी निवडून आल्यानंतर ड्रेनेज योजना मंजूर झाली. पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही योजना मंजूर केली. तेव्हा मंगलमूर्ती काॅलनी परिसरातील दोन किलोमीटरच्या ड्रेनेज वाहिनीचे काम प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी मी पाठपुरावा केला. जीएसटीमुळे या कामाचे अंदाजपत्रक बदलण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामाला २०१६ मध्ये मान्यता घेतली. ही सर्व कामे जुना वाॅर्ड ३४ मधील आहेत. त्या वार्डात नवलाई कधी नगरसेवक होते? नेमीनाथनगर, वाडीकर मंगल कार्यालय, गजानन हौसिंग सोसायटी, विकास चौक या परिसरातील ड्रेनेजची कामेही आमच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागत आहेत. नवलाई केवळ कामाच्या ठिकाणी जाऊन फोटोसेशन करून सोशल मीडियावर टाकतात. यात तुमचे काय श्रेय आहे, हे पुराव्यानिशी मांडा. मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो आहे. तुम्हाला हिशेब देण्यास बांधील नाही. माझे उत्तरदायित्व जनतेशी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.