हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:05 AM2019-12-16T00:05:33+5:302019-12-16T00:06:37+5:30
सांगली : कधी थंडी, कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी धुके अशा विचित्र व लहरी हवामानामुळे नागरिकांच्या ...
सांगली : कधी थंडी, कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी धुके अशा विचित्र व लहरी हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, यामुळे ताप, सर्दी, खोकला, कणकण, घशामध्ये खवखव अशी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. शहरात अगोदरच डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण असताना आता या जंतूसंसर्ग आजारांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरवड्यापासून हळूहळू थंडी सुरू झाली आहे. तरीही अचानक ढगाळ वातावरण व तापमानातही वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात शहरासह काही भागात दाट धुक्याने वातावरण बदलले होते. पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत धुक्याची झालर कायम होती. थंडी सक्रिय होईल, असे वाटत असतानाच पुन्हा पारा वाढू लागला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस होत असला तरी, त्याचा परिणाम जाणवत आहे.
वाढत्या थंडीमुळे ताप, कणकण, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी गर्दी होत आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून अगोदरच डेंग्यू, चिकुनगुन्या अशा आजारांनी थैमान घातले आहे. शहरातील उपनगरांमध्ये अजूनही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, ताप, कणकण अशी लक्षणे असलेल्या बहुतांश रुग्णांचा डेंग्यूचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत त्या त्या भागातील स्वच्छता व डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वातावरणातील बदलांमुळे सध्या संसर्गजन्य तापाचे रुग्ण वाढले आहेत. एकाचवेळी घरातील अन्य सदस्यांना ही लक्षणे आढळून येत आहेत. वातावरणाचा लहरीपणा कमी येईपर्यंत याचा त्रास नागरिकांना सहन करावाच लागणार आहे.
स्वाईन फ्लूचा धोका?
सकाळी थंडी, दिवसभर ऊन आणि वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे आजारी असताना प्रवास करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबरोबरच ताप, सर्दीची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी
घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. थंडीचा जोर वाढलेला असताना स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायात मोजे वापरावेत. थंड पदार्थ खाणे टाळावे. पिण्यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करावा. घशात खवखव जाणवल्यास कोमट पाण्याने गुळणी करावी. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.