वेबसाईट हॅक करुन माधवनगरच्या व्यापाऱ्यास पावणेचार लाखांचा गंडा
By admin | Published: April 9, 2017 12:38 PM2017-04-09T12:38:54+5:302017-04-09T12:38:54+5:30
एकाविरुद्ध गुन्हा : कंपनीचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न
आॅनलाईन लोकमत
सांगली : मुंबईतील एका कंपनीची वेबसाईट (संकेतस्थळ) हॅक करुन माधवनगर (ता. मिरज) येथील मुकुंद मदनगोपाल मालू (वय ३३) या व्यापाऱ्यास तीन लाख ७८ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. याप्रकरणी राजेश गुप्ता याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याने कंपनीचीही फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुकुंद मालू गुरुवार पेठेतील आरोग्य केंद्राजवळ राहतात. त्यांचा बॅग तयार करण्याचा कारखाना आहे. बॅगेसाठी लागणारा कच्चा माल ते मुंबईतील एका कंपनीकडून मागवून घेतात. दोन दिवसापूर्वी त्यांनी तीन लाख ७८ हजार रुपयांचा माल मागवला होता. याचे बिल त्यांनी आॅनलाईन करतो, असे कंपनीला सांगितले होते. त्यानंतर त्यांनी बिल भागविण्यासाठी कंपनीला त्यांचा बँक खात्याचा क्रमांक स्वत:च्या मेल आयडीवर टाकण्यास सांगितले होते. शुक्रवारी मालू यांच्या मेल आयडीवर कंपनीच्या नावाने एक मेल आला. त्यामध्ये बँक खात्याचा क्रमांक होता. मालू माधवनगरच्या तामिळनाडू मर्चंट बँकेत गेले. तिथे त्यांनी स्वत:च्या खात्यावरुन तीन लाख ७८ हजाराची रोकड आॅनलाईन कंपनीच्या बँक खात्यावर हस्तांतरित केली. रोकड हस्तांतरित झाल्याचा मालू यांच्या मोबाईलवर संदेश आला.
मालू यांनी कंपनीशी संपर्क साधून बिलाची रक्कम तुमच्या बँक खात्यावर हस्तांतरित झाल्याचे सांगितले. पण कंपनीने त्यांना अजून आम्ही आमच्या कंपनीचा बँक खात्याचा क्रमांक दिला नाही, रक्कम कशी हस्तांतरित केली? अशी विचारणा केली. त्यावेळी मालू यांनी त्यांच्या मेल आयडीवर कंपनीच्या नावाने जो बँक खाते क्रमांक आला होता, तो सांगितला. यावर कंपनीने हा आमचा खाते क्रमांक नाही, असे सांगितले. त्यानंतर कंपनीने तसेच मालू यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर राजेश गुप्ता नामक व्यक्तीने मुंबईतील कंपनीची वेबसाईट हॅक करुन कंपनीच्या नावाने स्वत:चा बँक खाते क्रमांक दिल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मालू यांनी शनिवारी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पहिल्यांदाच प्रकार
बँकेतून बोलत आहे, असे सांगून एटीएमचा पिन क्रमांक विचारुन खात्यावरुन रोकड काढण्याचे गुन्हे शहरात सातत्याने घडत आहेत. पण कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन बँकिगद्वारे गंडा घातल्याचा प्रकार सांगलीत पहिल्यांदाच घडल आहे. हा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला जाणार आहे.?