काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आठवडाभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:15+5:302021-07-08T04:18:15+5:30
सांगली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. याविरोधात ८ ते ...
सांगली : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस आणि खाद्यतेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. याविरोधात ८ ते १६ जुलैदरम्यान आठवडाभर सांगली जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हा आंदोलन कार्यक्रम ठरवून दिला आहे. त्यानुसार सह्यांची मोहीम, सायकल यात्रा आणि महिलांचे आंदोलन होणार आहे. गुरुवार, दि. ८ जुलैरोजी सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात मंत्री, आमदार, प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. ९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन होणार आहे. १२ जुलैरोजी शहर व जिल्हा पातळीवर सायकल यात्रा काढण्यात येणार आहे.
११ ते १५ जुलै या कालावधित महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, एन.एस.यु.आय., सेवादल, सर्व सेल यांच्यावतीने पेट्रोल पंपावर जाऊन इंधन दरवाढीविरोधात सामान्य नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक ब्लॉकमधून किमान पाच हजार नागरिकांच्या सह्या घेण्यात येतील. १३ जुलैला कुपवाडला, १५ रोजी मिरजेत सायकल यात्रा काढण्यात येणार आहे. १२ ते १५ जुलैदरम्यान महिला काँग्रेसच्यावतीने ब्लॉक पातळीवर आंदोलन करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.