जिल्ह्यातील आठवडा बाजार आजपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:30 AM2021-08-19T04:30:55+5:302021-08-19T04:30:55+5:30
सांगली : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे बंद असलेले आठवडा बाजार पुन्हा सुरु होणार आहेत. राज्य शासनाने शिथिल केलेेले ...
सांगली : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे बंद असलेले आठवडा बाजार पुन्हा सुरु होणार आहेत. राज्य शासनाने शिथिल केलेेले नियम आणि जिल्ह्यात कमी होत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज (गुरुवार)पासून जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार सुरू होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद केेले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये काही ठिकाणी बाजार सुरु झाले होते, मात्र पुन्हा एकदा ते बंद करण्यात आले. आठवडा बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसह भाजी विक्रेते, व्यापाऱ्यांची अडचण झाली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने नियमांचे पालन करत आठवडा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात येत आहे.
शहरातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यासाठी परवानगी द्या, या मागणीसाठी जनसेवा भाजीपाला संघटनेने गेल्या दोन दिवसांपासून सांगली आणि कुपवाडच्या उपनगरांमध्ये भाजीपाला विक्री बंद ठेवली होती. त्यामुळे मंगळवारी आणि बुधवारी उपनगरांमध्ये भाजीपाल्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागली. बाजार सुरु करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शंभोराज काटकर यांनी दिला होता.
चौकट
कोरोनाचे नियम पाळा
आठवडा बाजार सुरू करताना कोरोनाविषयक राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी नियंत्रण ठेवावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.