पावसात चिंब भिजूनच होते स्वागत !
By Admin | Published: June 8, 2017 11:13 PM2017-06-08T23:13:11+5:302017-06-08T23:13:11+5:30
पावसात चिंब भिजूनच होते स्वागत !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोकणात दाखल झालेला पाऊस अवघ्या काही तासांत साताऱ्यातही बरसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या साताऱ्यात पावसाची मजा लुटणाऱ्यांची यादी बरीच मोठी आहे. पाऊस येण्यापूर्वीच त्याच्या स्वागतासाठी आणि पाऊस साजरा करण्यासाठी सातारकरांची तय्यारी पूर्ण झाली आहे.
पावसाळ्यात साताऱ्याचा निसर्ग अधिकच खुलतो. त्यामुळे येथे पावसाचे स्वागत आपापल्या परीने करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरूणाईबरोबरच शाळेतील मुलं, नोकरदार, गृहिणी यांच्याही पावसाच्या स्वागताच्या संकल्पना भन्नाट असतात. शाळेत जाताना आलेला पहिला पाऊस चिंब भिजल्याशिवाय अनुभवता येत नाही, असे शाळकरी मुलांना वाटते. नोकरीच्या ठिकाणी खिडकीतून कोसळणाऱ्या धारा पाहणं आणि हात बाहेर काढून हा पाऊस अनुभवण्यात त्यांना धन्यता मानावी लागते. कोसळणाऱ्या धारा पाहून सुगरण गृहिणीला गरमा गरम कुरकुरीत भजी करण्याचा मोह होतोच. कांदा अन् बटाटा भजी आणि त्याबरोबर वाफळलेला चहा घेवून घरातल्यांबरोबर गप्पांची मैफिल रंगवणं हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम. घरातील ज्येष्ठही यात कुठे मागे नसतात. माडगं किंवा हुलगं करून त्याचा आस्वाद घेणं हा त्यांचा आवडीचा कार्यक्रम.
मित्र परिवाराबरोबर यवतेश्वर राईड
तरूणाईला पावसाळा मनसोक्त भिजायला खुणावतो. म्हणूनच पहिल्या पावसात ठरवून ही तरूणाई यवतेश्वरच्या घाटात फेरफटका मारायला जाते. पावसापासून संरक्षण करणारे रेनकोट अन् टोपी गाडीच्या डिकीत ठेवून निसर्गाच्या सानिध्यात पावसात भिजण्याचा आनंद ते घेतात. शहराभोवती असलेल्या निसर्गरम्य परिसरात जाणं आणि चिंब भिजणं येताना टपरीवरचा गरमा गरम चहाचा आस्वाद घेणं हे त्यांचे प्लान.
पहिल्या पावसात ‘बेअर हेड’
साताऱ्यात तरूणांचा एक ग्रुप पहिला पाऊस ‘बेअर हेड’ अनुभवतो. रेनकोट किंवा जर्किन घालून डोक्यावर टोपी न घालणं ही त्यांची संकल्पना आहे. ‘बेअर हेड’ पाऊस अनुभवणं धम्माल अनुभव असल्याचे हे युवक सांगतात. कोसळत्या पावसात तोंडावर पडणारे पाणी बोचते आणि डोक्यातून हे पाणी मानेवर आणि पाठीवरही जाते. आत तयार झालेली उब आणि कोटमधून आत आलेल्या पाण्यामुळे आलेला गारठा अशी संमिश्र धम्माल ही तरूणाई अनुभवते.
प्री वेडिंग फोटो शूट..!
निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेल्या कास परिसरात पहिल्या पावसाची प्रतिक्षा वाग्दत वधू आणि वर करत आहेत. लग्न ठरलेल्या या जोडप्यांना कोसळत्या पावसात फोटो शूट करण्याचे वेध लागले आहेत. म्हणून काहींनी जुलैमधील आपले विकएण्ड या फोटो शूटसाठी राखीव ठेवले आहेत. पहिल्या पावसानंतर येणारी हिरवळ आणि त्यावर वाग्दत वधु वरांचे छायाचित्रे ही नवीन संकल्पना रूजु पाहत आहे.बच्चे कंपनीबरोबर आऊटिंग..!
निसर्गात पाऊस अनुभवायला जाण्याचा मोह सर्व सातारकरांना होतो. बच्चे कंपनीनेही हे अनुभवावे म्हणून पालक आपल्या चिमुरड्यांसह पाऊस अनुभवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी त्यांना आऊटिंगला घेवून जातात. गाडीच्या काचेतून येणारे पावसाचे तुषार अनुभवण्याचा आनंद ही चिमुरडी घेतात.
पावसाचे पाणी देवपुजेसाठी
साताऱ्यातील काही कुटूंबांमध्ये पावसाचे पाणी देवमुजेसाठी वापरण्यात येते. घराच्या स्लॅबवर स्वच्छ रिकामे भांडी ठेवली जातात. मुसळधार पडणारा पाऊस थेट या भांड्यात पडतो.
मग हे पाणी प्लास्टिकच्या बाट्यांमध्ये
भरून ठेवले जाते. वर्षभर
देवपुजेसाठी हे पाणी
वापरण्यात येते.