सांगलीत तिरंगा यात्रेचे स्वागत
By admin | Published: August 26, 2016 10:46 PM2016-08-26T22:46:37+5:302016-08-26T23:15:03+5:30
खासदार, आमदारांचा सहभाग : ‘याद करो कुर्बानी’अंतर्गत आयोजन
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमांतर्गत खासदार संजयकाका पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सांगलीत तिरंगा यात्रा मोटारसायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
वखार भाग, गणपती मंदिर, टिळक चौकमार्गे तिरंगा यात्रा सांगलीवाडीत आली. तेथून मारुती चौक, बसस्थानक, शास्त्री चौकातून हरिपूर येथे यात्रा आली. तेथेही नागरिकांनी जोरदार स्वागत केले.
मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज व शास्त्री चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले. त्यावेळी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदेमातरम्’च्या घोषणाही कार्यकर्ते देत होते. यावेळी खा. संजयकाका पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग असून जनतेचे प्रश्न जाणून घेतले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार दिनकरतात्या पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, भारती दिगडे, मुन्ना कुरणे, युवराज बावडेकर, स्वरदा केळकर, शिवाजी डोंगरे,अरविंद ताबवेकर, भालचंद्र पाटील, प्रकाश बिरजे, माजी महापौर सुरेश पाटील, सुब्राव मद्रासी, सुभाष बुवा, दरीबा बंडगर, दीपक माने, धनेश कातगडे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मिरजेत यात्रेस प्रतिसाद
मिरज : मिरजेत खा. संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख मार्गावरून तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रेत तिरंगा ध्वजासह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. भारतनगर येथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला. बसवेश्वर पुतळा, शिवाजी पुतळा, सावरकर पुतळा, आंबेडकर पुतळा व गांधी पुतळा व शास्त्री पुतळ्यास खा. संजय पाटील यांनी अभिवादन केले. शिवाजी चौक, शनिवार पेठ, दत्त चौक, किसान चौक, शास्त्री चौक मार्गे गांधी पुतळ्याजवळ यात्रेचा समारोप झाला. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद जवान व क्रांतिकारकांच्या स्मृतीसाठी तिरंगा यात्रा काढण्यात आल्याचे खा. पाटील यांनी सांगितले. यावेळी मकरंद देशपांडे, ओंकार शुक्ल, शीतल पाटोळे, सचिन चौगुले, रोहित चिवटे, शरद जाधव, तानाजी घरगे, धनपाल खोत, सलीम मुश्रिफ, पांडुरंग कोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.