Ganpati Festival - सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:06 IST2019-09-02T16:04:32+5:302019-09-02T16:06:21+5:30
भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.

Ganpati Festival - सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत
सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.
महापुराच्या कटू आठवणी विसरून लाडक्या देवाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना यावेळी गणरायाच्या स्वागताच्या तयारीला फारसा वेळ मिळाला नाही. तरीही गेल्या दोन दिवसात बाजारपेठांमध्ये खरेदीला झालेली गर्दी आणि सर्वत्र तयारीचा उत्साह दिसून आला.
उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी सोमवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.
मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. महापुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर कुठेही सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.