सांगली जिल्ह्यात गणरायाचे उत्साहात स्वागत

By admin | Published: September 6, 2016 01:29 AM2016-09-06T01:29:10+5:302016-09-06T01:31:58+5:30

पारंपरिक वाद्यांचा गजर : शेकडो मंडळांकडून प्रतिष्ठापना; घरगुती श्रींचे भक्तिमय वातावरणात आगमन

Welcoming the enthusiasm of Ganaraya in Sangli district | सांगली जिल्ह्यात गणरायाचे उत्साहात स्वागत

सांगली जिल्ह्यात गणरायाचे उत्साहात स्वागत

Next

इस्लामपूर : शहर व परिसरात आज विघ्नहर्त्या गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. शहरातील घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या साथीने गणरायाचे स्वागत केले. यल्लम्मा चौक परिसरातील रिक्षा व्यावसायिकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांच्या पुढाकाराने दिवसभर ‘मोफत गणपती बाप्पा घरपोहोच’ सेवेचा उपक्रम राबवला.
शहर व परिसरात एकूण २९५ मंडळांची अधिकृत नोंदणी पोलिसांकडे झाली आहे. शहरातील मोठी परंपरा असणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने पौराणिक, सामाजिक आणि प्रबोधनपर देखाव्यांवर भर दिला आहे. या देखाव्यांवर अंतिम हात फिरवून त्याची चाचणी घेत गणेश भक्तांच्या मनोरंजनासाठी ते खुले केले जाणार आहेत.
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतेक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत झांजपथक, ढोल-ताशा आणि हलगीच्या कडकडाटात मंडळाच्या स्वागत मिरवणुका काढल्या. मसुचीवाडी येथील नवस कला, क्रीडा मंडळाने ७ सप्टेंबर रोजी मोफत रक्त गट तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहर व परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची तयारी सुरू केली आहे.
कसबे डिग्रज : येथे मंगलमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारपर्यंत घरगुती गणपती आगमनाची लगबग सुरु होती. आपटेमळा येथील शिवशंभो, शिवमुद्रा, शिवतेज, रामनगर येथील अष्टविनायक, शिवनेरी, बिरोबावाडी येथील शिवशक्ती इंदिरानगर, तरुण भारत, रौप्यमहोत्सवी श्रीकृष्ण, हिंदवी स्वराज्य, अंहिसा, शिवाजीनगर, संत तुकाराम, दत्त, रणझुंजार, रणसंग्राम, स्फूर्ती, डी ग्रुप, नाईकबा, जय जवान, मारुती मंदिर नृसिंह आदी ४० मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली.
कागवाड : कागवाड परिसरात घरगुती व सार्वजनिक मंडळांनी गणेशाचे जल्लोषात स्वागत केले. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, याकरिता पोलिसांच्यावतीने गणेशोत्सव मंडळांची पूर्वशांतता बैठक घेण्यात आली होती. गणेश मंडळांनी हा उत्सव शांततेत, सुरळीत पार पाडावा, असे आवाहन केले आहे.
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथे घरोघरी व सार्वजनिक गणपतीचे पारंपरिक वाद्यांच्या तालावर उत्साहात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक मंडळांनी डॉल्बीला फाटा देत धनगरी ढोल, ताशा या पारंपरिक वाद्यांच्या गजरात ‘मोरयाऽऽ’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. गावात छोट्या-मोठ्या १३ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. संपूर्ण परिसर गणेशमय झाला आहे. (वार्ताहर)


शेगावातील माने कुटुंबियांचा उपक्रम
शेगाव : जत तालुक्यातील शेगाव येथे गणेशोत्सवानिमित्त माने कुटुंबियांचा उपक्रम आगळावेगळा असाच आहे. शेगाव येथे विठ्ठल माने यांचे चहा व वडा-पावचे दुकान आहे. त्यांना त्यांचा मुलगा पंडित हा मदत करतो. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त ते गणेशमूर्तींची विक्री करतात. मात्र गेल्यावर्षीपासून गणेशमूर्र्तींची विक्री वेगळ्या पद्धतीने सुरु केली आहे. मूर्ती खरेदी करणाऱ्यांनी केवळ एक नारळ द्यायचा व गणेशमूर्ती घेऊन जायची. अशा ५१ गणेशमूर्ती माने कुटुंबीय उपलब्ध करुन देत आहेत. माने कुटुंबीय गणेशभक्तांकडून घेतलेले नारळ विकत नाहीत व घरीही घेऊन जात नाहीत. ते जमा झालेले नारळ गावातील मंडळांना दान देतात. काही मंडळांना ते त्या नारळांचे तोरण देतात.


घरपोहोच बाप्पा...
इस्लामपूर शहरातील यल्लम्मा चौक परिसरातील रिक्षा व्यावसायिकांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या पुढाकाराने आज दिवसभर गणेशभक्तांसाठी ‘मोफत घरपोहोच बाप्पा’ असा नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबवला. या उपक्रमातून घरी पोहोचलेल्या बाप्पांच्या आगमनानंतर सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाची भावना निर्माण झाली होती. बाप्पांना घरी पोहोचवणाऱ्या प्रत्येक रिक्षा व्यावसायिकास गणेशभक्तांनी मानाचा नारळ देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विटा शहरात ‘डॉल्बी’ला फाटा
विटा : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात आणि डॉल्बीला फाटा देत ढोल-ताशांच्या गजरात विटा शहरासह खानापूर तालुक्यात सोमवारी विघ्नहर्त्या श्री गणरायाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. सोमवारी गणेशचतुर्थीदिवशी विविध गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात व वाद्यांच्या निनादात जल्लोषी मिरवणुकीने श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. दरम्यान, खानापूर तालुक्यातील दहा गावात यावर्षी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
सोमवारी गणेशचतुर्थीदिवशी श्री गणरायाचे स्वागत करण्यात आले. सकाळी ११.२२ ते दुपारी १.५० पर्यंत मूर्ती प्रतिष्ठापना व पूजेचा मुहूर्त असल्याने घरातील गणेशाची या वेळेतच प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात आली. सोमवारी विट्याचा आठवडा बाजार असला तरी, भाजीपाला खरेदीपेक्षा गणेशमूर्ती व साहित्य खरेदी करण्यासाठीच भाविकांची बाजारपेठेत गर्दी झाल्याचे दिसून येत होते. दुपारी ३ वाजल्यानंतर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्ती घेण्यासाठी विट्यात गर्दी केली होती.
विटा पोलिस ठाण्याच्या आवाहनानुसार यावर्षी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्याने मूर्ती नेण्यासाठी मंडळांनी ढोल-ताशा, लेझीम व पारंपरिक वाद्यांचा वापर करून मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीने गणेश मूर्ती मंडपाकडे घेऊन जात होते. दरम्यान, विटा येथील विट्याचा राजा, शार्प ग्रुप यासह शहरातील २० व खानापूर तालुक्यातील १०० अशा सुमारे १२० मंडळांनी विधिवत पूजा करून गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली.
यावर्षी खानापूर तालुक्यातील भूड, सांगोले, धोंडगेवाडी, सुलतानगादे, कार्वे, बाणूरगड, देवनगर, भिकवडी बुद्रुक, करंजे व कळंबी या १० गावात ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविली आहे. (वार्ताहर)

Web Title: Welcoming the enthusiasm of Ganaraya in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.