सांगलीत सुसज्ज बसस्थानक करणार

By Admin | Published: November 19, 2015 11:46 PM2015-11-19T23:46:04+5:302015-11-20T00:20:32+5:30

बाबासाहेब मुळीक : राज्यात १२ ठिकाणी प्रकल्प; एप्रिलमध्ये सुरुवात

A well-equipped bus station in Sangli | सांगलीत सुसज्ज बसस्थानक करणार

सांगलीत सुसज्ज बसस्थानक करणार

googlenewsNext

सांगली : एसटी महामंडळाच्या राज्यातील महत्त्वाच्या जागांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बस स्थानके, यात्री निवास, सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह, तसेच चित्रपटगृहाची उभारणी केली जाणार आहे. अहमदाबाद येथील बस पोर्टच्या धर्तीवर राज्यातील १२ बस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये सांगलीचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे संचालक बाबासाहेब मुळीक यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, सांगलीचे मध्यवर्ती एसटी स्टॅन्ड १९६३ पासून अस्तित्वात आहे. सहा एकरामध्ये ही जागा असून, यामध्ये शहरी आणि लांब पल्ल्याच्या एसटींची वाहतूक येथून होते. याशिवाय कार्यशाळा, एसटी बॅँकेसह विविध कार्यालये या जागेमध्ये आहेत. परिवहन मंत्री रावते यांच्याशी बस पोर्टबाबत बैठक झाली असून, त्यामध्ये महामंडळाच्या राज्यातील महत्त्वाच्या व मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांवर अशी अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बसस्थानक, यात्री निवास, सभागृह, कार्यालये, स्वच्छतागृह, चित्रपटगृह आदींचा समावेश आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकल्प व्यवस्थापकांची नेमणूक केली आहे. हा सर्व खर्च महामंडळाकडून करण्यात येणार असून, जानेवारी २०१६ च्या बजेटमध्ये तरतूद केली आहे. राज्यातील १२ ठिकाणांची निवड केली आहे. शासनाकडून महामंडळास १८०० कोटी रुपये दोन टप्प्यात मिळणार आहेत. पनवेल बोरिवली-नॅन्सी कॉलनी, शिवाजीनगर पुणे, सांगली-माधवनगर, सोलापूर, पुणे नाका, कोल्हापूर-संभाजीनगर, नाशिक महामार्ग, धुळे-मध्यवर्ती, जळगाव, औरंगाबाद-मध्यवर्ती, नांदेड-मध्यवर्ती, अकोला, नागपूर याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. दोनमजली इमारत उभी करण्यात येणार आहे. खालच्या मजल्यावर एसटीसाठी जागा तसेच वरील मजल्यावर विविध प्रकारची एसटी कार्यालये उभारण्यात येणार आहेत.
बस पोर्टसाठी सांगलीची निवड करण्यात आल्यामुळे, १९६३ पासून अस्तित्वात असलेले सध्याचे मध्यवर्ती बस स्थानक इतिहासजमा होणार आहे. याबाबत ३० जूनरोजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी बैठक झाली असून, याची येत्या एप्रिल महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक बाबासाहेब मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन करार येत्या ३१ मार्चला संपणार आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबतची मागणी महामंडळाकडे केली जाणार आहे. एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांची मान्यता मिळावी, याबाबतची मागणी केली असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

माधवनगरसाठी दोन कोटींची मागणी
माधवनगरमध्ये बस स्थानकासाठी एसटीची दहा एकर जागा आहे. येथे दहा ते बारा फलाटांचे बसस्थानक, डेपो उभारला जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. यासाठी अरुण हळिंगळे, दिलीप शहा, बाळासाहेब काळे आदींनी व माधवनगर एसटी स्टॅन्ड व डेपो कृती समितीने मागणी केली आहे.
राज्यातील एसटी महामंडळाच्या महत्त्वाच्या जागांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज बसस्थानके, यात्री निवास, सभागृह, कार्यालय, स्वच्छतागृह, चित्रपटगृहाची उभारणी केली जाणार आहे. अहमदाबाद येथील बसपोर्टच्या धर्तीवर राज्यातील बस स्थानकांची उभारणी केली जाणार आहे.

Web Title: A well-equipped bus station in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.