मिरज पश्चिम भागात ऊसतोडी रखडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:27 AM2021-02-24T04:27:50+5:302021-02-24T04:27:50+5:30
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ...
कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजार एकर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. वेळेत ऊसतोडी न झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.
फडकरी, तोडणी वाहने आणि ट्रॅक्टरचालक यांच्या ‘बिदागी’ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी सगळ्याच साखर कारखान्यांकडे तोडणी टोळ्यात कमी मजूर आले. याचा मोठ्या प्रमाणावर फटका वाहनधारकांना बसला आहे. लाखोंच्या उचली देऊनही मजूर आले नाहीत. अवकाळी पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला. ऊसतोडणी मशीनची संख्या कमी आहे. त्यातच यावेळी बाहेरील कारखाने तोडणीसाठी आले नाहीत. या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे ऊसतोडणी लांबलेल्या असल्याचे चित्र आहे.
तोड लांबल्याने थेट फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. तुरे फुटल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऊसतोडणी होऊन बिले कधी मिळणार, असा शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत आहेत. ऊसतोडी लांबल्यामुळे पीककर्ज कसे भरायचे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाणीपुरवठा संस्थांच्या वसुलीवरही परिणाम होतो आहे. यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा संस्था, सोसायटी आणि शेतकरी यांचे अर्थचक्र बिघडत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.