गणित आणि शास्त्र नाही, तर इंजिनिअरिंग कसले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:27 AM2021-03-17T04:27:38+5:302021-03-17T04:27:38+5:30
सांगली : अभियांत्रिकी शिक्षणातून भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र विषय वगळण्याच्या कथित प्रस्तावानंतर शिक्षण क्षेत्रात बराच गदारोळ माजला आहे. गणित ...
सांगली : अभियांत्रिकी शिक्षणातून भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र विषय वगळण्याच्या कथित प्रस्तावानंतर शिक्षण क्षेत्रात बराच गदारोळ माजला आहे. गणित नाही तर ते इंजिनिअरिंग कसले ? असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे. निर्णय मागे घेण्याचीही मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे.
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी तीन विषय वगळण्याचे सूतोवाच केले आहे. त्यावर उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. सहस्त्रबुद्धे यांच्या प्रस्तावानुसार अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारापैकी कोणत्याही तीन विषयांत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शिवाय त्यासाठी पीसीएमची अट रद्द केली आहे. डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी असेही म्हटले आहे की, अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात या विषयांचा अभ्यास करावाच लागेल, त्यामुळे गणित, भौतिकशास्त्र व रसायन शास्त्र नाकारलेेले नाही. बारावीला हे तीन विषय सोडून इंजिनिअरिंग ग्राफीक्स, संगणकशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही अभियांत्रिकीला प्रवेश घेता यावा असे उद्देश आहे. त्यांना पहिल्या वर्षात पीसीएमचा अभ्यास करावाच लागेल. त्यासाठी महाविद्यालयांना जोड अभ्यासक्रम घ्यावा लागेल.
आकरावी व बारावीला गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र न शिकलेल्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकावे लागेल. त्यामुळे हे तीन विषय रद्द केले नसून शिकावेच लागणार आहेत, असा डॉ. सहस्त्रबुद्धे यांचा दावा आहे. केवळ प्रवेशासाठी या विषयांची अट काढल्याने गुणवत्ता रद्द होणार नाही. बारावीपर्यंत भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र शिकले नाही म्हणून त्याला इंजिनिअर होण्यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे एआयआयसीटीईचे स्पष्टीकरण आहे.
काही तज्ज्ञांनी निर्णयाचे स्वागतही केले आहे. बारावीच्या बारा विषयांपैकी अनेक विषय शास्त्र शाखेशी निगडीत आहेत, त्यामुळे एआयसीटीईच्या निर्णयाचा बाऊ करण्याची गरज नाही. मार्केटिंग, ग्राफिक्स, व्यवस्थापन आदी विषयांतील पारंगत विद्यार्थी अभियांत्रिकीकडे येतील, त्यामुळे परिपूर्ण अभियंते घडतील, असा या तज्ज्ञांचा सूर आहे.
चौकट
परिपूर्ण अभियंते घडतील
तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयामुळे परिपूर्ण अभियंते घडतील अशी काहींची भूमिका आहे, तर गणित न शिकता अभियंता कसे होता होईल ? असाही सवाल काहीजण करत आहेत. इस्लामपूरच्या राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. सुषमा कुलकर्णी म्हणाल्या की, बारावीला पीसीएम नसणाऱ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येत नाही, शिवाय अभियांत्रिकीचे शिक्षण फक्त तांत्रिक स्वरूपाचे आहे. सध्याच्या बदलत्या काळात अभियंता परिपूर्ण असणे गरजेचे आहे. त्याला मार्केटिंग, व्यवस्थापन, अर्थकारण इत्यादी व्यावसायिक अंगांचेही ज्ञान हवे. नव्या धोरणातून असे परिपूर्ण अभियंते पुढे येतील. त्यामुळे एआयसीटीईच्या निर्णयाचा बाऊ करता कामा नये.
कोट
बदलत्या काळासोबत शिक्षणातही चांगले बदल व्हायला हवेत. नव्या निर्णयाने क्षमतापूर्ण अभियंते घडतील. गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा अभ्यास अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात करावा लागणारच आहे, त्यामुळे एआयसीटीईच्या निर्णयाबद्दल गहजब नको. अनेक मुलांना अभियंता होण्याची संधी यामुळे मिळणार आहे. शिवाय महाविद्यालयांनाही जोड अभ्यासक्रम घेऊन या विषयांचे अध्यापन करायचे आहे.
- डॉ. सुषमा कुलकर्णी, प्राचार्या, राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर
कोट
अभियांत्रिकीची अनेक गृहितके गणित, भौतिकशास्त्र व रसायन शास्त्राशिवाय पूर्णच होत नाहीत. गणित नाही तर अभियांत्रिकी शिक्षण कसले? नव्या निर्णयामुळे अभियंत्यांऐवजी पदवीधारक कारकून निर्माण होतील. कौशल्यामध्ये कमी पडतील. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होण्याची गरज आहे. मेकॉलेची शिक्षणपद्धती नव्याने राबविण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र वगळू नये.
- प्रा. आर. ए. कनाई, कार्यकारी संचालक, अण्णासाहेब डांगे, शैक्षणिक संकुल, आष्टा
कोट
अभियांत्रिकी शिक्षणासाठी गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे अत्यावश्यक विषय आहेत. नव्या निर्णयाद्वारे मुलांनी उपजत बुद्धीद्वारे शिकावे अशी अपेक्षा आहे. अभियांत्रिकी शिक्षण सर्वांसाठी खुले केले असून, बुद्धिमत्ता असणाऱ्यांनीच या क्षेत्राकडे वळावे अशीही अपेक्षा आहे. गणिताचा पाया नसणारेही चांगले अभियंते होऊ शकतात हे यातून स्पष्ट होईल.
- डॉ. डी. व्ही. घेवडे, प्राचार्य, पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बुधगाव
कोट
बारावीला गणित, रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र नसले तरी अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला हे विषय असतीलच, त्यामुळे गणित, शास्त्राशिवाय अभियांत्रिकी शिक्षण होणार नाही. तूर्त हा निर्णय पदवीसाठी लागू आहे. भविष्यात पदविकेसाठीही येेईल. पूर्ण निर्णय आल्यानंतर त्यातील फायदे-तोटे स्पष्ट होतील.
- प्रा. अमोल विभुते, शासकीय महिला तंत्रनिकेतन, तासगाव
पॉईंटर्स
जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या - १९
पदवी महाविद्यालये - ६
एकूण जागा - ४,७४८