पोलिसांवर हल्लाप्रकरणी तपासातील गौडबंगाल काय? प्रतापुरात नाचक्की : पोलिसांना मारहाण,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:47 PM2018-04-30T23:47:19+5:302018-04-30T23:47:19+5:30
जत : प्रतापूर (ता. जत) येथे काही दिवसांपूर्वी सहा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले, तर तीन शासकीय वाहनांवर दगडफेक करून सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले
जयवंत आदाटे।
जत : प्रतापूर (ता. जत) येथे काही दिवसांपूर्वी सहा पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले, तर तीन शासकीय वाहनांवर दगडफेक करून सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले. या घटनेत सांगली व सातारा पोलिसांची पुरती बदनामी झाली. परंतु या गंभीर घटनेचा तपास अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे यापाठीमागे नेमके गौडबंगाल काय? याची उलट-सुलट चर्चा जत तालुक्यात सुरू आहे.
जत तालुक्यातील प्रतापूर येथे उरुसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोक्काअंतर्गत कारवाई झालेला फरारी संशयित दत्ता रामचंद्र जाधव (रा. गुरुदत्त कॉलनी, प्रतापसिंहनगर, सातारा) याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला. यामध्ये सहा पोलीस जखमी झाले.
याप्रकरणी वीसजणांविरोधात मंगळवारी रात्री उशिरा जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी दहाजणांना अटक करण्यात आली. त्यांना जत न्यायालयात उभे केले असता, दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. पोलीस कोठडी संपून त्यांना आता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. परंतु तपासात कोणतीच प्रगती झालेली नाही. पोलीस कोठडीतील आरोपी न्यायालयीन कोठडीत व फरारी संशयित आरोपी अद्याप गायबच आहेत. त्यामुळे जत पोलिसांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
या कारवाईत सातारा ग्रामीणचे प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे, जतचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार कवठेमहांकाळचे प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, मयूर वैरागकर यांच्यासह १२५ पोलिसांनी भाग घेतला होता. संशयित प्रतापूर गावातच उघडपणे वावरत होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छाप्याची जय्यत तयारी करूनही त्याने वेषांतर करून पोलिसांना गुंगारा दिला.
प्रतापूर गाव लहान असून लोकसंख्या तीन हजार आहे. जत शहरापासून तीस, तर विजापूर-गुहागर राज्यमार्गावरुन बारा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले दत्ता जाधव, भेजा वाघमारे, जया जाधव, बंडा पैलवान, दीपक लोंढे, लल्लन जाधव, सूरज ऊर्फ पप्पू घुले, धनू बडेकर, आरती जाधव, ऋतुजा जाधव (सर्व रा. गुरुदत्त कॉलनी, प्रतापसिंहनगर, सातारा) हे दहाजण अद्याप फरार आहेत, तर युवराज रामचंद्र जाधव, खली ऊर्फ कृष्णा हणमंत बडेकर, अमर रामचंद्र भांडे, शिवाजी बाळू पवार, अमोल रेवाप्पा होनेकर, मनीषा युवराज जाधव, सातारा, मथुरा शामराव ऐवळे, मयुरी धोंडीराम ऐवळे (बाज, ता. जत), करिष्मा भीमू हेगडे, सोमनाथ उत्तम मोरे या दहाजणांना अटक करण्यात आली आहे.
फरारी संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके उस्मानाबाद व सातारा येथे पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती जत पोलिसांनी दिली. परंतु मागील पाच दिवसांत तपास कामात काहीच प्रगती दिसून येत नाही. यामुळे येथील नागरिकांमधून या प्रकरणाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या गंभीर घटनेचा तपास अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पुढे काय होणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
फरारी आरोपी डिजिटल फलकावर!
प्रतापूर गावात उघडपणे दत्ता जाधव याचे डिजिटल फलक झळकत आहेत. गावातील उरूसानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन तोे स्वत: करतो. दरवर्षी याची पूर्वतयारी महिनाभर सुरू असते. परंतु याची माहिती गोपनीय काम करणाºया पोलिसांना कशी काय मिळाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.