घरकुल चौकशीचे गौडबंगाल काय?
By admin | Published: October 9, 2015 11:05 PM2015-10-09T23:05:12+5:302015-10-09T23:05:12+5:30
काँग्रेसमधून सवाल : सुधीर गाडगीळांनंतर आता नीताताई मैदानात
सांगली : भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या मागणीत महापालिकेचा घरकुल प्रकल्प होताच, मग प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या नीता केळकर यांनी स्वतंत्र चौकशीची मागणी कशासाठी केली? असा प्रश्न भाजपसह सत्ताधारी काँग्रेसला पडला आहे. महापालिकेच्या राजकारणावरून भाजपअंतर्गत गाडगीळ विरूद्ध केळकर असा श्रेयवाद रंगला आहे. शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमध्ये सध्या सांगली महापालिकेवर आरोप, टीका-टिपणी करण्याची चढाओढ सुरू आहे. त्याची सुरूवात आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली. महापालिकेत गेल्या सात वर्षात पाचशे कोटीचा घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. आता महापालिकेचे उत्पन्न शंभर-सव्वाशे कोटीच्या घरात, त्यात पगार व दैनंदिन खर्च शंभर कोटीपर्यंत, मग उरले वीस ते पंचवीस कोटी. त्यात किती भ्रष्टाचार होऊ शकतो? असा सवाल काँग्रेस, राष्ट्रवादीतून केला गेला. शासनाच्या विविध योजनांचा कोट्यवधीचा निधी महापालिकेला मिळाला आहे. या निधीतून गाडगीळ ज्या पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात, तो भाजप महापालिकेच्या सत्तेत असतानाच या योजना मंजूर झाल्या. त्याची वर्कआॅर्डर देण्यात आली. कामाची भराभर उद्घाटने झाली होती. मग या घोटाळ्यात त्यांचा भाजपही सहभागी आहे का? असा सवाल केला गेला. पण त्याचे उत्तर मात्र गाडगीळांनी आजअखेर दिलेले नाही.
राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचे नगरसेवक गौतम पवार यांनी तर थेट भाजप शहराध्यक्षांवर घोटाळ्याचा आरोप करून खळबळ उडून दिली होती. पण त्याचे उत्तरही शहराध्यक्षांनी दिलेले नाही. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरते आहे? अशी शंका जनतेला येऊ लागली आहे. त्यात आता प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी घरकुलांचा प्रश्न हातात घेतला आहे. सात ते आठ वर्षापासून झोपडपट्टीवासीय घरकुलांपासून वंचित आहेत. त्यांना घरे दिली जात नाहीत. त्यामुळे आयुक्त व प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. गाडगीळांनी महापालिकेच्या गैरकारभाराच्या चौकशीची मागणी केली. त्यात घरकुल प्रकल्पाचाही समावेश होता. मुख्यमंत्र्यांनीही गाडगीळांना चौकशीची हमी दिली आहे. म्हणजे भविष्यात ज्यावेळी महापालिकेची चौकशी होईल, तेव्हा घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार आहे. मग नीतातार्इंनी स्वतंत्ररित्या घरकुल चौकशीची मागणी करण्याचे कारण काय? आता त्याही मुख्यमंत्र्यांकडेच मागणी करणार आहेत. म्हणजे एकाच प्रकल्पाची दोनदा चौकशी होणार, असेच म्हणावे लागेल. गाडगीळ व केळकर यांच्यातील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे श्रेयवादासाठी तर ही मागणी केली गेली नसावी ना? की आणखी काय गौडबंगाल आहे?, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
सल्लागार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित कसे?
भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी पत्रकार बैठक घेऊन, घरकुल प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली. या बैठकीवेळी घरकुल प्रकल्पाच्या सल्लागार असलेल्या एका संस्थेच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या. ही सल्लागार संस्था प्रकल्प राबवितानाच वादग्रस्त ठरली होती. मग त्या प्रतिनिधी पत्रकार परिषदेवेळी कशासाठी उपस्थित होत्या? याचे कोडे उलगडलेले नाही.
तेव्हाचे
पदाधिकारी भाजपचेच!
महापालिकेच्या घरकुल योजनेला सर्वाधिक विरोध भाजपकडूनच झाला. तत्कालीन आमदार संभाजी पवार यांनी या झोपडपट्टीवासीयांच्या बाजूने रान पेटविले होते. त्यातही प्रशासनाने योजनेचा प्रारंभ केला. कालांतराने स्थायी समितीचे सभापतीपद भाजपकडे असताना ठेकेदार बदलण्यात आला. केवळ कंपनीचे नाव बदलून त्याच ठेकेदाराला पुन्हा काम देण्यात आले. घरकुलाचा सारा घोळ भाजपच्या पदाधिकाऱ्यांमुळेच झाल्याचा आरोप झाला होता. आताच्या भाजपचेच पदाधिकारी चौकशीची मागणी करीत आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.