हे कसले स्वच्छता अभियान घेता?

By Admin | Published: September 30, 2016 12:58 AM2016-09-30T00:58:24+5:302016-09-30T01:31:16+5:30

नगरसेवकांचा आक्रोश : महापालिका आयुक्तांवर अस्वच्छतेप्रश्नी टीकेची झोड

What kind of cleanliness campaign does it take? | हे कसले स्वच्छता अभियान घेता?

हे कसले स्वच्छता अभियान घेता?

googlenewsNext

सांगली : महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, गटारी तुंबल्या आहेत, ड्रेनेजची वाट लागली आहे. आयुक्त केवळ वॉर्डावॉर्डात जाऊन नुसतीच पाहणी करीत आहेत. कामाच्या फायली पडून आहेत. नागरिक शिव्याशाप देत आहेत. नागरिकांना सुविधा नाहीत, मग कसली स्वच्छता मोहीम घेता, अशा शब्दात गुरुवारी नगरसेवक प्रदीप पाटील यांनी थेट आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे स्वच्छता अभियानाच्या बैठकीचा नूरच पालटला.
निमित्त होते महापालिकेत आयोजित स्वच्छता मोहिमेच्या नियोजन बैठकीचे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानास दोन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त महात्मा गांधी जयंतीदिनी म्हणजे २ आॅक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विशेष महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त खेबूडकर यांनी नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलाविली होती. या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज, नगरसेवक राजेश नाईक, प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत काँग्रेसचे नगरसेवक प्रदीप पाटील यांनी प्रशासनाच्या लालफिती कारभारावर टीकेची झोड उठविली.
ते म्हणाले की, शहरात रस्ते नाहीत, गटारी नाहीत. ड्रेनेज तुंबून सांडपाणी रस्त्यावर आले आहे. आयुक्त केवळ पाहणी दौरेच करीत आहेत. प्रत्यक्षात कोणतेच काम झालेले नाही. नागरिक नगरसेवकांच्या घरापर्यंत येत आहेत. माझ्या घरी दु:खद घटना घडली असतानाही, शंभर ते दीडशे लोक सुविधांसाठी येऊन बसले होते. आम्ही कामांच्या फायली दिल्या आहेत, पण त्यावर सह्या होत नाहीत. किती दिवस अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागायचे? नागरिक आता एकेरीवर आले आहेत. आमची व पक्षाची अब्रू चालली आहे. नगरसेवकांना रस्त्यावर फिरणेही मुश्किल झाले आहे. आयुक्तांनी योग्य वाटतील ती कामे तरी सुरू करावीत, असे म्हणत नागरी सुविधा नाहीत, मग कसले स्वच्छता अभियान घेता, असा सवाल केला. पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बैठकीचा नूरच पालटला. आयुक्त खेबूडकर यांनी ही बैठक स्वच्छता अभियानासंदर्भात असून, तुमचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र चर्चा करता येईल, असे म्हणत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. (प्रतिनिधी)


कोण काय म्हणाले?
दिग्विजय सूर्यवंशी : दर मंगळवारी होणारी स्वच्छता मोहीम सुरू ठेवावी, गुडमॉर्निंग पथकाला दंडाचे अधिकार द्यावेत.
अनारकली कुरणे : सफाई कामगारांपैकी अनेकजण गैरहजर असतात. त्यांना बसून पगार मिळतो. सर्व कामगार स्वच्छतेसाठी कामाला लावा.
विष्णू माने : स्वच्छता अभियान बारमाही सुरू रहावे. डेंग्यूबाबत नागरिकांवर थेट कारवाई करावी.
संतोष पाटील : बांधकाम, गुंठेवारी प्रमाणपत्र देताना शौचालय सक्तीचे करावे. स्वच्छता निरीक्षकांना कारवाईचे अधिकार द्यावेत. शौचालय नसल्यास संबंधितांची घरपट्टी दुप्पट करावी.

साहेब, चष्मा बदला!
प्रदीप पाटील यांनी बैठकीतच प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली. आयुक्त खेबूडकर यांनाही उद्देशून ‘तुम्ही जो चष्मा लावून काम करीत आहात, तो काढा म्हणजे परिस्थिती काय आहे, हे दिसून येईल. लोक नगरसेवकांना शिव्याशाप कशापद्धतीने देतात, हे दिसून येईल. असे म्हणताच महापौर शिकलगार यांनी हस्तक्षेप करीत या विषयावर पुन्हा बैठक घेऊ, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर आयुक्तांनीही ‘मी कुठलाही चष्मा लावलेला नाही, माझ्या टेबलावर ३८ कोटींच्या फायली आहेत’, असे प्रत्युत्तर दिले.


२५ हजारावर सहभाग शक्य : खेबूडकर
आयुक्त खेबूडकर म्हणाले, महापालिका क्षेत्रात १७ महाविद्यालये आहेत. १६७ माध्यमिक शाळा आहेत. याचबरोबर हजारो बचत गटाच्या महिला आहेत. अशा सर्वांना एकत्र करुन ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी ७९ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वत: मोहीम राबवणार आहोत. सकाळी काढण्यात येणाऱ्या प्रभातफेरीत दहा हजाराहून अधिक शालेय मुले सहभागी होतील. ३१ डिसेंबरपूर्वी महापालिका क्षेत्र हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करुया. त्याशिवाय आपला स्मार्ट सिटी योजनेत समावेश होणार नाही.

Web Title: What kind of cleanliness campaign does it take?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.