ही कसली संचारबंदी? हा तर मुक्त संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:40+5:302021-04-16T04:26:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासनाने संचारबंदी लागू केली. पण प्रत्यक्षात संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र गुरुवारी शहरात दिसत होते. सकाळपासूनच सांगलीकर रस्त्यावर होते. दुचाकी, चारचाकी वाहनांची ये-जा नेहमीसारखीच सुरू होती. भाजी, फळ विक्रेतेही रस्त्यावर बसून व्यवसाय करीत होते. शहरात संचारबंदी नव्हे तर मुक्त संचार सुरू होता. पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.
शहरात बुधवारी रात्री आठपासून संचारबंदीला सुरुवात झाली. प्रशासनाकडून अनावश्यक कामासाठी घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या. पण संचारबंदीचा फारसा परिणाम नागरिकांवर झाल्याचे चित्र कुठेच दिसत नव्हते. सकाळीच शिवाजी मंडईत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरच व्यवसाय सुरू केला होता. बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यावर फळ विक्रेतेही होते. महापालिकेने भाजी व फळे रस्त्यावर बसून विक्री करण्यास मनाई केली होती. पण या निर्णयाला विक्रेत्यांनी हरताळ फासला होता. त्यात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेचे पथक कोठेच रस्त्यावर दिसत नव्हते.
सकाळपासूनच नागरिक काही ना काही कारणांनी घराबाहेर पडल्याचे दिसत होते. शहरातील काॅलेज कार्नर, शिवाजी मंडई, रिसाला रोड, हरभट रोड, सांगली-मिरज रस्ता अशा अनेक रस्त्यांवर गर्दी होती. दुचाकी, चारचाकी वाहनांची तर रेलचेल होती. बाहेर पडणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेतील आहेत की नाही, याची साधी चौकशीही केली जात नव्हती. सर्वत्र नागरिक, वाहनधारकांचा मुक्त संचार सुरू होता. सार्वजनिक वाहतूक व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवा असे स्टीकर लावून अनेक वाहने रस्त्यावर उतरली होती. एकूणच शहरात संचारबंदीचा परिणाम कुठेच दिसत नव्हता. दुपारी पोलिसांनी संचलन केल्यानंतर शहरातील वर्दळ कमी झाली.
चौकट
चौकात बॅरिकेड्स आणि पोलीसही
शहरात सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पोलिसांनी वाहनधारकांना अडवून चौकशी केली. पण काही वेळातच ही तपासणीही थांबली. चौकाचौकात पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत. पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला आहे. अनेक ठिकाणी तर पोलीस असूनही नागरिकांची चौकशी होत नसल्याचे चित्र दिसत होते.
चौकट
बँकांसमोर रांगा
संचारबंदीच्या काळात शहरातील सर्वच बँकांसमोर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गुरुवारी बँकांसमोर गर्दी पाहायला मिळाली. एटीएमवरही ग्राहकांची गर्दी होती.