खोके देणाऱ्या घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती, ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीसांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:18 PM2024-01-10T12:18:34+5:302024-01-10T12:19:32+5:30
साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे
सांगली : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्याने खोक्याची संस्कृती जन्माला आली आहे. खोके देणाऱ्यांची आणि घेणाऱ्यांची ही कसली राजकीय संस्कृती?, असा सवाल ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला.
सांगलीवाडी येथील ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून भारती विद्यापीठाच्या शालेय समिती अध्यक्षा विजयमाला कदम, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील, वसंत पाटील, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विकत घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांनाही राजकीय संस्कृती नसते. आज पक्षीय राजकारणात उघडपणे जनता विकली जात आहे. ज्या प्रतिनिधींना जनतेने निवडून दिले आहे, तेदेखील आज उघडपणे विकले जात आहेत. हे प्रतिनिधी खोक्यांनी विकले किंवा विकत घेतले जात असतील, ही कसली राजकीय संस्कृती आज आपण पाहत आहोत?, आज विकत घेणाऱ्यांना आणि विकत देणाऱ्यालाही संस्कृती नसते.
जाती-धर्माच्या नावाखाली सत्तेचा उपभोग घेण्यात राजकारणी व्यस्त असून, सध्याचे राजकारण अशुद्ध झाले आहे. शुद्ध राजकारणासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या राजकारणाची गरज आहे.
लोकांच्या मनात जाती-धर्माचे विष कालवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशावेळी समाजामध्ये सांस्कृतिक संवादाची गरज आहे. माणसाचे बंधुतेत रूपांतर करण्याचे काम भारतीय संस्कृतीने केले आहे. धर्म ही शुद्ध कल्पना आहे. मुक्तीची कल्पना आहे. सर्व धर्मातील चांगुलपणा म्हणजे भारतीय संस्कृती होय. चांगुलपणाची विभागणी करून चालत नाही. साने गुरुजींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून ती संस्कृती विचारात घेणे गरजेचे आहे.
हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, जैन आदी धर्मातील संस्कृती आणि विश्वात्मकता विचारात घेतली पाहिजे. महात्मा गांधी, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर यांच्या विचारांची बेरीज करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.