आयात उमेदवारीमागचे गणित काय?

By Admin | Published: November 4, 2016 12:33 AM2016-11-04T00:33:52+5:302016-11-04T00:33:52+5:30

पृथ्वीराज पाटील : धनदांडगेपणाचा राष्ट्रवादीचा आरोप हास्यास्पद

What is the mathematics behind the importation? | आयात उमेदवारीमागचे गणित काय?

आयात उमेदवारीमागचे गणित काय?

googlenewsNext

सांगली : काँग्रेसवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करून आणण्यामागचे गणित लोकांसमोर मांडावे. त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने राष्ट्रवादीतील तिकीट वाटपाचा पर्दाफाश केल्यामुळे राष्ट्रवादीचे खरे चित्र लोकांसमोर आले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, काँग्रेस उमेदवारावरील राष्ट्रवादी नेत्यांची टीका हास्यास्पद आहे. पक्षात तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम केल्यामुळे मोहनराव कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. निष्कलंक, निष्ठावंत व सामाजिक भान असलेला नेता म्हणून त्यांची निवड पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीने गोरे यांची उमेदवारी जाहीर करताना असा कोणता निकष लावला होता?, याचे उत्तर द्यावे. राष्ट्रवादीमध्ये कशाप्रकारे उमेदवारी दिली जाते, याचा पोलखोल त्यांच्याच पक्षातील दिलीपतात्या पाटील यांनी केला होता. त्यामुळे आम्ही वेगळा आरसा दाखविण्याची गरज नाही. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. आघाडीबाबतचा फॉर्म्युला १९९९ मध्येच निश्चित झाला असला तरी, तो राष्ट्रवादीने कितपत पाळला, याचाही विचार व्हायला हवा.
संख्येने जास्त असूनही त्यांनी मित्रपक्ष म्हणून जागा सोडली असती, तर तो खरा आघाडीधर्म ठरला असता. आघाडीच्या चर्चा तडजोडीतूनच होत असतात. गतवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे काँग्रेसने पाळलेला आघाडीधर्मच कारणीभूत होता. त्यामुळे यंदा त्यांनी काँग्रेसला मदत करणे अपेक्षित होते. काँग्रेसनेच माघार का घ्यायची? उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
उमेदवाराच्या गुन्ह्यांची माहिती कळाली
राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आम्हाला त्यांच्यावर दाखल झालेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. दहापेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्याची माहिती आहे. काही गोष्टींबाबत आम्ही आक्षेपही नोंदविले होते, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली.
उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच असल्याने पक्षातील काहींनी उमेदवारी मागितली होती. मात्र आता अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याने सर्वजण एकत्र येणार आहेत. नाराज असलेल्या लोकांशी चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची निवडणूक आम्ही एकसंधपणेच लढू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: What is the mathematics behind the importation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.