युवा नेत्यांचे सत्तेसाठी काय पण!
By admin | Published: March 16, 2017 11:40 PM2017-03-16T23:40:01+5:302017-03-16T23:40:01+5:30
घराणेशाहीचा नवा फंडा : जिल्हा परिषदेतून थेट पंचायत समितीमध्ये
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
महाराष्ट्रातील अनेक नेत्यांची राजकीय कारकीर्द गल्लीपासून दिल्लीपर्यंत झळाळती राहिली आहे. अलीकडे राजकारणात घराणेशाहीचा नवीन फंडा आला आहे. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काही नेते, घराणी दोन पायऱ्या खाली उतरत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी दोन पायऱ्या खाली उतरून पंचायत समिती सदस्यत्व स्वीकारले आहे.
वाळवा तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सहकार, शिक्षण, वित्तीय संस्थांचे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. त्यांचा वारसा जपणारे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी तालुक्याबरोबरच राज्याच्या नेतृत्वाची धुरा पार पाडली आहे. या घराण्यातील कासेगावचे देवराज पाटील यांनी कमी वयातच सरपंच ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत मजल मारली आहे.
काही घराण्यांना लागलेली सत्तेची चटक सहजासहजी सुटत नाही. हे वास्तव देवराज पाटील यांच्याबाबतही खरे ठरले आहे. त्यांचा जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांनी राजकीय प्रवाहात राहण्यासाठी पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
येलूर व पेठ जिल्हा परिषद मतदार संघावर नानासाहेब महाडिक गटाचे वर्चस्व कायम अबाधित राहिले आहे. २५ वर्षांहून अधिक काळ येलूर मतदार संघावर महाडिक यांच्या घरातील एक तरी सदस्य निवडून जातोच. मागीलवेळी येलूरमधून त्यांच्या पत्नी सौ. मीनाक्षी महाडिक, तर पेठमधून पुत्र सम्राट महाडिक यांनी बाजी मारली होती. थोरले पुत्र राहुल महाडिक यांनी शैक्षणिक संस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा येलूर आणि पेठ मतदारसंघ आरक्षित झाल्याने महाडिक यांना पहिल्यांदाच सत्तेपासून दूर राहावे लागणार होते. परंतु अखेरच्या टप्प्यात राहुल महाडिक यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी भरली आणि निवडणूक जिंकली. यातून त्यांनी घराणेशाहीच टिकवून ठेवली. सत्तेच्या प्रवाहात राहणे आणि राजकीय घराणेशाही टिकविणे यासाठी वाट्टेल ते करण्यास सगळेच नेते मागे-पुढे बघत नाहीत, हेच खरे!