विशाल पाटील यांचा संबंधच काय?

By Admin | Published: February 4, 2017 12:04 AM2017-02-04T00:04:52+5:302017-02-04T00:04:52+5:30

पतंगराव कदम; तो महान नेता, मी लहान आहे!

What is the relation of Vishal Patil? | विशाल पाटील यांचा संबंधच काय?

विशाल पाटील यांचा संबंधच काय?

googlenewsNext



सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मिरज वगळता इतर सर्व तालुक्यातील उमेदवारांची निश्चिती झाली आहे. उमेदवारांची नावे शेवटच्या दिवशीच जाहीर होतील. मिरज तालुक्याचा निर्णय प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील एकमताने घेतील. यात विशाल पाटील यांचा संबंधच काय? तो महान नेता आहे, मी लहान आहे, अशा शब्दात शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार बैठकीत टोला लगावला.
मिरज तालुक्यात वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करीत असल्याबद्दल विचारले असता डॉ. कदम म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल. मिरज वगळता सर्व तालुक्यांतील उमेदवारांची यादी एकमताने तयार झाली आहे. मिरजेबाबत प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील निर्णय घेणार आहेत. त्यांनी नावे अंतिम करून माझ्याकडे द्यायची आहेत. यात विशाल पाटील
याचा संबंध येतोच कुठे? त्यामुळे तो कोणाशी चर्चा करतो, यावर मी कसे भाष्य करणार?
गतवेळी मदन पाटील यांनी उमेदवारांची यादी दिली. तीच अंतिम करण्यात आली. मदन पाटील यांनी त्या उमेदवारांना निवडूनही आणले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
भाजप-शिवसेना सोडून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. खानापुरातील एक जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. शिराळ्यातील दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला आहे. जतमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा दिली जाईल. बाकीच्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसची यादी तयार असली तरी, सहा फेब्रुवारीपर्यंत हा घोळ सुरूच राहील. माघारीच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होईल, असेही कदम यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यावर कदम म्हणाले की, भाजपची ही घोषणा आम्ही दररोजच ऐकतो. देशातील प्रत्येक खेड्यात काँग्रेस रूजली आहे. तिला संपविणे इतके सोपे नाही. सत्ता येते आणि जाते, पण पक्ष संपत नाही. आगामी उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभेच्या निवडणुका देशाच्या राजकारणासाठी ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरतील.

कडेगाव-पलूसमध्ये फरक पडणार नाही
पलूस-कडेगावमध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून मी हे बघत आलो आहे. मला आता त्याची सवय झाली आहे. या आघाडीचा काँग्रेसवर काहीही फरक पडणार नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व मंत्री प्रचाराला आणले. अगदी शंभर कोटीचे पॅकेज देतो म्हणाले. पलूसमध्ये निकाल काय, तर राष्ट्रवादी शून्य, भाजप एक! राष्ट्रवादीने भाजप-सेना सोडून आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपशी आघाडी करणाऱ्यांना एबी फॉर्मही देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले होते. आता तेच काय तो निर्णय घेतील. विधानपरिषदेवेळी मोहनराव कदम यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. काय घडले, ते सर्वांनीच बघितले आहे, असेही कदम म्हणाले.

Web Title: What is the relation of Vishal Patil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.