शिक्षणमंत्री काय योगदान देणार?
By admin | Published: October 13, 2015 10:10 PM2015-10-13T22:10:03+5:302015-10-13T23:52:19+5:30
निरंजन डावखरे : माहिती अधिकारात तावडे केवळ आठवी उत्तीर्ण असल्याचे उघड
इस्लामपूर : राज्याचे शिक्षणमंत्री अभियांत्रिकीची पदवी घेतल्याचे सांगत असले तरी, आमच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असून, ते आठवी उत्तीर्ण आहेत. शिक्षणासारख्या क्षेत्रात ते काय योगदान करणार? असा सवाल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ निरंजन डावखरे यांनी मंगळवारी केला. याचवेळी त्यांनी, राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजाच्या प्रश्नावर लढा द्यावा, असे आवाहनही केले.येथे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘जयंत युवा आत्मभान’ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी युवक कार्यकर्त्यांना हेल्मेट व वाहन परवान्याचे वितरण करण्यात आले.
आ़ डावखरे म्हणाले की, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही ठोस धोरण सरकारकडे नाही. उलट आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़.माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, सत्तेवर नाही याची मानसिकता तयार करा़ लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा़ जिल्हाध्यक्ष शरद लाड म्हणाले की, आपण विरोधी पक्षात असल्याने जबाबदारी वाढली असून आता लोकांच्या प्रश्नावर लढावे लागेल़ तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामरावतात्या देशमुख, माणिकराव पाटील, पी़ आऱ पाटील, प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, जगन्नाथ पाटील, विष्णुपंत शिंदे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, रवींद्र बर्डे, बी़ के. पाटील, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील, वैभव शिंदे, अॅड़ चिमण डांगे, शहाजी पाटील, विराज नाईक, संग्राम पाटील, राहुल पवार, रणजित पाटील, अनिल पाटील उपस्थित होते़ गोपाळ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़, तर संभाजी पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
रस्त्यावर उतरा : लोकांसाठी लढा उभारा
यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी कार्यकर्त्यांना वास्तवाचे भान देण्याचा प्रयत्न केला. डावखरे म्हणाले, आपण सत्तेवर नाही, याचे भान ठेवा. लोकांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्यासाठी लढा उभारा. सत्तेशिवाय लोकसेवा करायची आहे, याची मानसिकता तयार करा. आपण विरोधी पक्षात असल्याने, सत्ता असताना असलेल्या जबाबदारीपेक्षा आताची जबाबदारी मोठी आहे.
‘मेक इन इंडिया’ म्हणजे निव्वळ भूलभुलैया
आ़ डावखरे म्हणाले की, भाजप पक्ष खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आला आहे. काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १0-१५ लाख जमा करू, असे त्यांनी सांगितले़ ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली युवकांना खोटे स्वप्न दाखविले जात आहे़ निव्वळ भूलभुलैया सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही धोरण नाही़