राजेंद्रअण्णांचं उद्या काय होणार?

By admin | Published: February 15, 2017 11:35 PM2017-02-15T23:35:17+5:302017-02-15T23:35:17+5:30

जयंत पाटील : आटपाडी परिसरात राष्ट्रवादीच्या प्रचार सभा

What will happen tomorrow? | राजेंद्रअण्णांचं उद्या काय होणार?

राजेंद्रअण्णांचं उद्या काय होणार?

Next


आटपाडी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जिल्ह्यात सर्वात जास्त विश्वास राजेंद्रअण्णा देशमुखांवर होता. अजित पवारांचा विश्वास अमरसिंहांवर होता. पण राजेंद्रअण्णांनी का पक्ष सोडला, हे फक्त त्यांनाच माहीत. माझे राजेंद्रअण्णांवर प्रेम आहे. त्यामुळे सत्तेसाठी भाजपत गेलेल्या अण्णांचे, जर उद्या हे सरकार पडले, तर काय होईल, याची मला काळजी असल्याची उपहासात्मक टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.
राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी दिघंची येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील चौकात आणि आटपाडीतील बाजार पटांगणात सभा घेतली.
ते म्हणाले की, राजेंद्रअण्णांचा शब्द आपण कधी मोडला नाही. पण ज्या भाजपच्या नेत्यांमुळे येथील पाणीप्रश्न सुटू शकला नाही, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसह विधानसभेत पश्चिम महाराष्ट्र निधी दिला जाऊ नये यासाठी लेखी निवेदन दिले, विरोध केला, त्यामुळे टेंभू, ताकारी योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्या पक्षात जाऊन राजेंद्रअण्णांनी काय साधले? राजेंद्रअण्णांवर माझे मोठ्या भावाप्रमाणे काल प्रेम होते, आज प्रेम आहे आणि उद्याही राहील. पण त्यांनी अचानक पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याने आपल्याला खूप वाईट वाटले, दु:ख झाले आणि आता त्यांची काळजीही वाटते. कारण सत्तेत नाही, म्हणून त्यांनी भाजपत प्रवेश केला. शिवसेनेने जर २३ फेब्रुवारीनंतर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले, तर यांचे काय होईल?
तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, राजेंद्रअण्णांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपत प्रवेश करुन विश्वासघात केला आहे. शेवटच्या दिवशी ११ वाजता अचानक त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म माझ्या हातात दिले. अजिबात वेळ न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार देऊ शकलो नाही. विश्वासघातांचे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार चांगलाच धडा शिकवेल.
यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, राष्ट्रवादीचे दिघंची जि. प. गटाचे उमेदवार अतुल जावीर, दिघंची पंचायत समिती गणाच्या उमेदवार उषा कलाप्पा कुटे, निंबवडे गणाच्या उमेदवार ज्योती दीपक चाधव, आटपाडी जि. प. गटाचे उमेदवार सादीक खाटीक उपस्थित होते. (वार्ताहर)
पडळकरांचं नेतृत्व : कपाळावर मारला हात!
‘राजेंद्रअण्णांची गाडी आताच माझ्या गाडीपुढे होती. राष्ट्रवादीत असताना कधी त्यांनी गाडीवर पक्षाचा झेंडा लावला नाही. पण आता भाजपचा झेंडा लावला होता. आता तर गेलाय, कशाला एवढा मोठा झेंडा लावता?’ असे आ. पाटील म्हणताच, एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, ‘गेलात ते गेलात, वर गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली गेलो म्हणता! काय हे?’ कपाळावर हात मारुन घेत ते पुढे म्हणाले, ‘निदान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेलो, असे तरी म्हणायचे. आता पुन्हा ते पक्षात आले, तर हणमंतराव देशमुख यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल’.
विश्वास गेला, देशमुखांच्या वाड्यात!
लोक म्हणतात, विश्वास कुठे गेला? तर पानिपतच्या लढाईत गेला. पण हे आता बदलावे लागेल. आता लोक म्हणतील, विश्वास कुठे गेला? तर विश्वास राजेंद्रअण्णांच्या वाड्यात गेला... असा पक्षाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केली.

Web Title: What will happen tomorrow?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.