साखर कारखानदारांचे एमडी काय तोडगा काढणार? अध्यक्षांना बोलवा; 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्यांचा चर्चेस नकार
By अशोक डोंबाळे | Published: November 15, 2023 08:58 AM2023-11-15T08:58:10+5:302023-11-15T08:58:25+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक निष्फळ: 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्यांचा एमडीबरोबर चर्चा करण्यास नकार; चार दिवसात पुन्हा बैठक
सांगली: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मागील गळती हंगामातील ४०० आणि चालू हंगामात ३५०० रुपये ऊस उत्पादकांना मिळावे, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन चालू आहे. या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सायंकाळी बोलविलेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्यांनी कारखान्यांचे (एमडी) व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चेस नकारा दिला. कारखान्यांच्या अध्यक्षां बरोबर बैठक घेण्याची मागणी केली. त्यानुसार चार दिवसात पुन्हा बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आश्वासन दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. बसवराज तेली, 'स्वाभिमानी'चे कार्याध्यक्ष संदीप राजोबा, महेश खराडे, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे, सर्व कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते. या बैठकीत संदीप राजोबा यांनी कारखान्यांचे कार्यकारी संचालक ऊस दराबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. यामुळे कारखान्यांच्या अध्यक्षांबरोबर बैठक घेऊन ऊस दराची कोंडी फोडावी, त्यानंतरच कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्याची विनंती केली. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी याना निमंत्रित करण्याची मागणी केली. त्यानुसार डॉ. राजा दयानिधी यांनी पुन्हा चार दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
तोडगा निघेपर्यंत ऊस तोडो रोखू नका: राजा दयानिधी
ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी पुन्हा चार दिवसात बैठक घेण्यात येणार आहे. दराचा प्रश्न सुटेपर्यंत आंदोलकांना ऊस तोडी रोखू नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 'स्वाभिमानी'च्या पदाधिकार्यांना दिली.
दत्त इंडिया आजपासून ऊस तोडी थांबविणार : संदीप राजोबा
सांगलीतील वसंतदादा साखर कारखाना चालवत असलेल्या दत्त इंडिया कारखान्याना व्यवस्थापनाने जोपर्यंत ऊस दराची कोंडी फुटत नाही, तोपर्यंत ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा बुधवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांना कारखाना व्यवस्थापनाने दिला आहे.