आजपर्यंत तुम्ही जे पाहिलं नाही..अनुभवले नाही.. ते इस्लामपुरातील या केशकर्तनालयात दिसेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 12:44 AM2020-01-02T00:44:32+5:302020-01-02T01:14:19+5:30
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षे अध्यापन केले, मात्र त्यात मन न रमल्याने सात वर्षांपूर्वी तो केशकर्तनाच्या व्यवसायात उतरला. वडील आणि दोन्ही भाऊ अभियंता आहेत. त्यांचे मार्गदर्शनही मिळते. संतोष चौधरी, विजय भोसले हे त्याचे सहकारी व्यवसायात मदत करतात. विक्रमने सुरू केलेल्या ग्रंथालयात मनोरंजन, विनोदी, ललित, कथा, कादंबरी यासह राज्य, केंद्रीय आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, कनिष्ठ पदाच्या परीक्षांची पुस्तके ठेवली आहेत.
युनूस शेख ।
इस्लामपूर : पोन मारिअप्पन या युवकाचे तामिळनाडूतील तुतीकोरीन शहरात केशकर्तनालय असून, तेथे त्याने दीड हजार पुस्तकांचे वाचनालय ग्राहकांसाठी सुरू केले आहे. त्याच्या या उपक्रमाचा फोटो व्हायरल होत इस्लामपूर शहरापर्यंत पोहोचला आणि येथील आष्टा नाका परिसरातील विक्रम झेंडे यानेही प्रेरणा घेत नववर्षाच्या प्रारंभी स्वत:च्या केशकर्तनालयात असे ग्रंथालय सुरू केले.
विक्रम सुदाम झेंडे (वय ३६, रा. वाळवा) हा उच्चविद्याविभूषित युवक. हिंदी विषयातून त्याने एम. ए. बी. एड्.ची पदवी मिळवली आहे. आई, वडील आणि दोन भाऊ बेंगलोरमध्ये वास्तव्यास आहेत, तर विक्रम वाळवा येथील आजीकडे दत्तक आला आहे.
पदवी घेतल्यानंतर तीन वर्षे अध्यापन केले, मात्र त्यात मन न रमल्याने सात वर्षांपूर्वी तो केशकर्तनाच्या व्यवसायात उतरला. वडील आणि दोन्ही भाऊ अभियंता आहेत. त्यांचे मार्गदर्शनही मिळते. संतोष चौधरी, विजय भोसले हे त्याचे सहकारी व्यवसायात मदत करतात. विक्रमने सुरू केलेल्या ग्रंथालयात मनोरंजन, विनोदी, ललित, कथा, कादंबरी यासह राज्य, केंद्रीय आयोगाच्या स्पर्धा परीक्षा, कनिष्ठ पदाच्या परीक्षांची पुस्तके ठेवली आहेत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांना थांबावे लागले, तर त्यावेळी त्यांनी आवडीची पुस्तके वाचावीत आणि वेळ सार्थकी लावावा, या हेतूने विक्रमने हे पाऊल उचलले आहे. व्यवसायातील सर्व अत्याधुनिक सुविधा दुकानात उपलब्ध असतानाच, आता ग्राहकांना वाचनातून शहाणे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
- पंधरा हजार रुपये खर्च
विक्रम झेंडे याने तामिळनाडूच्या पोन मारिअप्पन याच्या दुकानातील ग्रंथालयाचा व्हायरल फोटो बघितल्यानंतर महिन्याभरापासून आपल्या दुकानातील ग्रंथालयाची तयारी सुरू केली. त्यासाठी ६ हजार रुपये खर्च करून कपाट बनवले. तसेच विविध प्रकारची पुस्तके मित्र परिवाराकडून मिळवली. स्वत:चे ९ ते १० हजार रुपये घालून आणखी काही पुस्तके विकत घेत पहिल्या टप्प्यात २०० पुस्तकांचा संच ठेवला आहे. या उपक्रमासाठी त्याने १५ हजार रुपयांचा खर्च केला आहे.
- पाच ग्राहकांची बैठक व्यवस्था
विक्रमचे १० बाय १५ च्या गाळ्यात ओम केशकर्तनालय आहे. तामिळनाडूच्या दुकानातील ग्रंथालयाचा व्हायरल फोटो बघितल्यानंतर त्यातून प्रेरित होऊन विक्रमने आपल्याही दुकानात असे ग्रंथालय उभारण्याचा निश्चय केला. दुकानात पाच ग्राहक बसतील, अशी व्यवस्था करून दोनशे पुस्तकांचे ग्रंथालय साकारले आहे.