जात प्रमाणपत्रापुढे कोरोनाची काय बिशाद? ‘सामाजिक न्याय’मध्ये झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:21 AM2020-12-25T04:21:59+5:302020-12-25T04:21:59+5:30
सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची ...
सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची बेफिकिरी पाहता, यापैकी कोणालाच कोरोनाचे गांभीर्य नसावे, असेच स्पष्ट होत होते. उमेदवार आणि विद्यार्थी या दोहोंच्या सुरक्षिततेचे भान नव्हते. खुद्द प्रशासनाचेही या अनागोंदीकडे लक्ष नसल्याचे आढळले.
अचानक गर्दी लाढल्याने प्रशासनावर ताण आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष कागदपत्रेही कार्यालयात आणून द्यायची आहेत. यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी रांगा लावल्या आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. गर्दीमुळे प्रत्येकजण एकमेकाच्या अंगावर ढकलला जातोय. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे भान कोणालाच राहत नाही. मास्कदेखील नावालाच आहेत. प्रत्येकजण मास्क हनुवटीवरच घेऊन रांगेत थांबतोय. विद्यार्थ्यांसाठी वेगळी खिडकी केली असून तेथेही रांगा आहेत. त्यांनाही कोरोनाचे भान नसावे असेच चित्र आहे.
प्रवेशद्वारात सॅनिटायझरची बाटली आहे, पण ती आपल्यासाठी नसावी असेच समजून प्रत्येकजण तिच्याकडे दुर्लक्ष करून जातो. राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही गर्दी पाहता ती लवकरच येईल असेच वाटते.
तूर्त विद्यार्थ्यांना प्राधान्य
दाखल्यांसाठीची गर्दी आणि अपुरे मनुष्यबळ पाहता, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची जात प्रमाणपत्रे तातडीने दिली जात आहेत. सध्या दररोज ८० ते १०० प्रस्ताव येत आहेत, निर्गतीही त्याचगतीने सुरु असल्याचे उपायुक्त खुशाल गायकवाड म्हणाले.
मनुष्यबळाअभावी दाखले वितरणावर मर्यादा येत आहेत. तरीही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. उमेदवारांच्या दाखल्यांचा विचार नंतर केला जाईल. निवडून आलेल्यांची यादी मिळताच त्यांच्या जातीची पडताळणी केली जाईल. त्यामुळे तूर्त उमेदवारांपेक्षा शैक्षणिक दाखल्यांकडे लक्ष आहे. कोरोनाविषयी काळजी घेत आहोत.
- खुशाल गायकवाड, उपायुक्त, समाजकल्याण
प्रशासनातर्फे दक्षता
कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रवेशद्वारातच सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. सुरक्षारक्षक प्रत्येकाला सॅनिटायझर वापराची सूचना करतो. सोशल डिस्टन्सिंगसाठी मात्र गर्दीवर नियंत्रण राहिलेले नाही. वारंवार सूचना करुनही लोक ऐकत नसल्याचा अनुभव आहे.
रोज १५० अर्ज
निवडणूक व महाविद्यालयीन प्रवेश यामुळे सध्या दररोज सरासरी १५० अर्ज दाखल होत आहेत. त्यामध्ये भावी सरपंचांचे प्रस्ताव जास्त आहेत. शिक्षणासाठीचे त्रुटीविरहीत अर्ज तात्काळ निकाली काढले जात आहेत. चौकशी असेल तरच वेळ जात आहे.
निवडणूक झाल्यावरच
उमेदवारांकडून ऑनलाईन प्रस्ताव घेतले जात आहेत. त्याची एक प्रत समाजकल्याण कार्यालयात स्वीकारली जात आहे. उमेदवारी दाखल करताना तूर्त टोकन जोडावे लागेल. निवडून आलेल्या सदस्यांचीच जात पडताळणी केली जाईल. रोज ७० ते ८० अर्ज येत आहेत, पडताळणीचे प्रमाणपत्र मात्र सध्या दिले जात नाही.
--------