‘पेपरफुटी’मागे दडलंय काय?
By admin | Published: January 1, 2016 10:38 PM2016-01-01T22:38:10+5:302016-01-02T08:28:49+5:30
विधानसभेत प्रश्न : तपास कर्मचाऱ्यांभोवतीच; सूत्रधार नामानिराळाच
सांगली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका पेपरफुटीचे प्रकरण होऊन महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला तरी पोलिसांचा तपास पुढे सरकलेला दिसत नाही. या तपासात दडलंय तरी काय? अशी आता चर्चा रंगू लागली आहे.
दोन महिला आरोग्य सेविका सोडल्या, तर अन्य कुणालाही अटक झाली नव्हती. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडल्यानंतर आणखी पाचजणांना तडकाफडकी अटक झाली. आतापर्यंतचा तपास पाहिला तर तो कर्मचाऱ्यांभोवतीच घुटमळला आहे. यामागचा सूत्रधार अजूनही नामानिराळाच आहे. त्याच्यापर्यंत पोलीस पोहोचणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
पेपरफुटीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर दोन संशयित आरोग्य सेविका महिलांना ताब्यात घेतले. सात-आठ दिवसांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली. पण न्यायालयातून त्यांना लगेच जामीनही मंजूर झाला. तत्पूर्वी आरोग्य सेविका पदाची फेरपरीक्षाही घेण्यात आली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले, चौकशी सुरु राहिली; मात्र अटक कुणाला झाली नाही. आ. शिवाजीराव नाईक यांनी विधानभेत हा प्रश्न उपस्थित केल्याने पोलीस अधिकाऱ्यांना तातडीने पत्रकार परिषद घेऊन आणखी पाच संशयितांना अटक केली असल्याचे जाहीर करावे लागले. पण पेपर फोडण्याचा हा कट कुठे शिजला? त्यामध्ये अधिकारी आघाडीवर होते का कर्मचारी? कोणाच्या आदेशाने छापखान्यातील प्रश्नपत्रिका बाहेर काढण्यात आली? प्रश्नपत्रिका काढण्याच्या प्रक्रियेत कोणाचा सहभाग होता? उमेदवारांना गाठून त्यांच्याशी सौदा करण्याची यंत्रणा कशाप्रकार राबविली? किती उमेदवारांना गाठले? त्यांच्याशी किती लाखाचा सौदा झाला? सौद्यातून आलेली लाखो रुपयांची वाटणी कशी आणि कोठे झाली? या सर्व बाबींचा पोलिसांना अद्याप उलगडा केलेला नाही.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांची साखळी यामध्ये गुंतली आहे. कवलापूर (ता. मिरज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील सतीश मोरे या कर्मचाऱ्यास अटक केली आहे. संजय कांबळे न्यायालयातून जामीन घेण्यासाठी धडपडू लागला आहे. यापूर्वी अटक केलेली आरोग्य सेविका शाकीरा उमराणी कवलापूरचीच आहे. सुरुवातीला तपास सुरु केल्यानंतर कवलापूरचा रहिवासी परंतु तासगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणुकीस असलेल्या आरोग्य सेवकास ताब्यात घेतले होते. त्याला चार दिवस दररोज चौकशीला बोलाविले. मात्र पुन्हा त्यास सोडून दिले. स्थानिक पातळीपुरतचा मर्यादित असलेला हा तपास अद्याप पूर्ण न झाल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तपासावर राजकीय नेते टीका करीत आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. (प्रतिनिधी)
पोलीस पुराव्यात, संशयित न्यायालयात
पोलिसांनी खरा सूत्रधार छापखान्यातील कनिष्ठ बार्इंडर रामदास फुलारे असल्याचे जाहीर केले आहे. तरीही ते गेल्या दोन दिवसांपासून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करीत आहेत. यावरुन खरा सूत्रधार नामानिराळाच असल्याचे बोलले जात आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात अधिकारी व कर्मचारी हे शासकीय नोकर आहेत. त्यांना अटक करण्यापूर्वी पुरावे गोळा करणे महत्त्वाचे असल्याचे पोलीस एकीकडे सांगत आहेत, तर दुसरीकडे मात्र यातील संशयित फरारी होऊन न्यायालयात जामीन घेण्यासाठी धडपडत आहेत.
औषध निर्माणचे काय?
आरोग्य सेविका पदाचा पेपर फुटल्याचे पोलिसांनी जाहीर केले. पण आ. शिवाजीराव नाईक यांनी लक्षवेधी मांडल्यानंतर पोलिसांनी औषध निर्माण अधिकारी पदाचा पेपर फुटल्याचे जाहीर केले. आरोग्य सेविका पदाची फेरपरीक्षा पुन्हा तातडीने घेण्यात आली. मग औषध निर्माण अधिकारी पदाची परीक्षा का घेण्यात आली नाही? अशी चर्चा सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय झाला आहे.