सांगली जिल्ह्याच्या स्पोर्टस् ट्रेन्डला बदलाची चाके
By admin | Published: August 29, 2016 12:17 AM2016-08-29T00:17:36+5:302016-08-29T00:17:36+5:30
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय झेप : इनडोअर खेळांची चलती, आॅनलाईन माहितीचाही कौशल्यवृद्धीसाठी वापर
आदित्यराज घोरपडे, सांगली : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा तिरंगा फडकवण्याची किमया सांगली जिल्ह्यातील जिगरबाज खेळाडूंनी केली आहे. जिल्ह्याचा स्पोर्टस् ट्रेन्ड बदलला असून, प्रशिक्षकांसह पालकांनीही खेळावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. खेळातील विविध कौशल्ये शिकण्यासाठी आता गुगल व यू-ट्यूबचीही मदत घेतली जात आहे.
क्रीडापंढरी सांगलीने देशाला अनेक मातब्बर खेळाडू दिले. कुस्ती, कबड्डी, बुध्दिबळ, वेटलिफ्टिंग, अॅथलेटीक्स, जिम्नॅस्टिक, स्केटिंग, खो-खो आदी खेळांमध्ये जिल्ह्याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. मैदानावर घाम गाळणाऱ्या खेळाडूंमागे प्रशिक्षकरूपी ‘गाईड’ खंबीरपणे उभे आहेत. खो-खोमध्ये युवराज जाधव, मिलिंद चावरेकर, नरेश सावंत या खेळाडूंनी दक्षिण आशियाई स्पर्धेपर्यंत धडक मारली. स्केटिंगमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सूरज शिंदे यांच्या खेळाडूंनी सिंगापूर व थायलँड येथील स्पर्धा गाजवली. जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी थेट लिम्का व गिनीज बुकमध्ये ‘एन्ट्री’ केली आहे. सांगलीच्या जिम्नॅस्टिकला आता ‘अच्छे दिन’ आले आहेत. शांतिनिकेतन परिसरात राष्ट्रीय दर्जाचे अद्ययावत जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. त्याला प्रतिसादही मिळत आहे. गौतम पाटील यांच्या नेत्वृत्वाखाली डझनभर खेळ शांतिनिकेतनमध्ये सुरू आहेत. विशेषत: अश्वारोहण (अॅक्वेस्टेरीयम) खेळाने राज्याचं लक्ष शांतिनिकेतनकडे वेधले आहे.
नितीन शिंदे, एस. एल. पाटील, प्रा. जहाँगीर तांबोळी, रवींद्र आरते, प्रा. संजय पाटील, डॉ. सुहास व्हटकर, बापू समलेवाले, रुक्साना मुलाणी, पूजा पाटील, माया खटके आदी क्रीडा संघटकांमुळे सांगली जिल्ह्याच्या क्रीडा विकासास चालना मिळाली आहे.
क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
रामकृष्ण चितळे, नाना सिंहासने, गौतम पाटील, रामभाऊ घोडके, मुन्ना कुरणे ही मंडळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराच्या शर्यतीत आहेत.
मनपाने स्वबळावर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याने चुरस वाढली आहे.
विविध खासगी क्रीडा क्लासेसची संख्या वाढली असून, त्यामुळे दर्जेदार खेळाडू घडण्यास हातभार लागत आहे.
शासनाने मान्यता दिलेल्या नवीन खेळांमुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे.