उद्योगांची चक्रे फिरली, वसाहत गजबजली--कामगारांचा तुटवडा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 10:52 PM2020-05-25T22:52:40+5:302020-05-25T22:52:58+5:30
कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तडाखा आणि त्यानंतर परप्रांतीय कामगारांचे परतणे या संकटांना अंगावर घेत उद्योजकांनी जिद्दीने चक्रे फिरती ठेवली आहेत. फौंड्री, टेक्स्टाईल, खाद्यपदार्थ, रसायन, खते, कृषी प्रक्रिया, प्लास्टिक, रंग, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोर्जिंग, फॅब्रिकेशन या उद्योगांना चालना मिळाली आहे.
सांगली : सांगली-मिरज व कुपवाड वसाहतीतील सत्तर टक्क्यांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतींचा परिसर गजबजला आहे. उद्योगांना कच्च्या मालाचा तुटवडा आणि कामगार टंचाईला तोंड द्यावे लागत असल्यामुळे बहुतांश उद्योगांत एकच शिफ्ट सुरू आहे.
कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तडाखा आणि त्यानंतर परप्रांतीय कामगारांचे परतणे या संकटांना अंगावर घेत उद्योजकांनी जिद्दीने चक्रे फिरती ठेवली आहेत. फौंड्री, टेक्स्टाईल, खाद्यपदार्थ, रसायन, खते, कृषी प्रक्रिया, प्लास्टिक, रंग, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोर्जिंग, फॅब्रिकेशन या उद्योगांना चालना मिळाली आहे. कुपवाड वसाहतीतील सुमारे ८५० पैकी सातशेहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, कामगारांची आरोग्य तपासणी याची काळजी घेतली जात आहे.
परप्रांतीयांना रोखण्यात : उद्योजकांना यश
सांगली, मिरज व कुपवाड वसाहतीतील हजारो परप्रांतीय कामगार गेल्या महिन्याभरात आपापल्या गावी परतले, पण अनेक कारखानदारांनी त्यांना रोखण्यातही यश मिळविले. कारखाना बंद असला तरी पूर्ण पगार दिला, शिवाय जेवणा-खाण्याचीही व्यवस्था केली. आता कारखाने सुरू होताच या कामगारांनी नव्या जोमाने काम सुरू केले आहे. एका फौंड्रीतून ओरिसा भागातील तब्बल ९० कामगार एकाचवेळी निघून गेले. कारखान्यात पुरेसा कच्चा माल नसल्याने त्यांना आठच तास काम मिळत होते. त्यांची मागणी किमान बारा तासांची होती. ती पूर्ण न झाल्याने ते निघून गेले. सध्या हा उद्योग बंद आहे.
मुंबई, पुणे बंदमुळे अडचणी
प्लास्टिक, फौंड्री, रसायने, औषधे, रंग या उद्योगांचा बहुतांशी कच्चा माल मुंबई व पुण्याहून येतो. या शहरांत कोरोनामुळे नाकेबंदी असल्याने कच्च्या मालाच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्याचा त्रास येथील उद्योजकांना होत आहे. उपलब्ध कच्च्या मालाच्याआधारे एका शिफ्टमध्ये काम सुरू आहे.
दररोज १२ मेगावॅट विजेचा वापर
कुपवाड औद्योगिक वसाहतीत दररोज १७ ते १९ मेगावॅट विजेचा वापर होतो. लॉकडाऊन काळात तो खालावला होता. आता कारखाने सुरू झाल्याने तो १२ मेगावॅटवर पोहोचला आहे. १ जूनपासून तो आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
जिल्हाभरात १७८७ उद्योग सुरू
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात २५ मे अखेर १ हजार ७८७ उद्योग सुरू झाले. २२ हजार ६९२ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. औद्योगिक वसाहतींत ९१४ कारखाने व ११ हजार ३८९ कामगार, तर अन्यत्र ८७३ उद्योग व ११ हजार ३०३ कामगारांचा समावेश आहे. अन्नपदार्थांचे उत्पादन, डेअरी, पशु व पोल्ट्रीखाद्य, शीतगृहे, गोदामे, पुठ्ठ्याचे बॉक्स, औषधे व वैद्यकीय साधने, पॅकिंग आदी उद्योग सुरू झाले.