सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:16 PM2019-05-10T15:16:53+5:302019-05-10T15:17:50+5:30
सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.
सांगली : शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. गेल्या सोळा वर्षांत नव्याने एकही वाहनतळ विकसित होऊ शकलेले नाही. त्यात रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहनांची कोंडीही होत आहे.
शहरात सुमारे दीड लाखांहून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने आहेत. प्रत्येक कुटुंबामागे किमान एक तरी वाहन आहे. त्यात घरात वाहन पार्क करण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच वाहने पार्क केली जात आहेत. सर्वात बिकट अवस्था मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपती पेठ, कापडपेठ, मारुती रोड, हरभट रोडवर दिसून येते. या परिसरात शाळा क्रमांक एक, आनंद चित्रमंदिर, जयश्री टॉकीज अशी वाहनतळे आहेत. त्यापैकी शाळा क्रमांक एकनजीकच वाहनांची गर्दी दिसून येते. अन्य ठिकाणी रस्त्यावर वाहने पार्क केली जातात.
मारुती रोड तर नेहमीच गजबजलेला असतो. या रस्त्यावर वाहन पार्क करण्यासाठीही जागा उपलब्ध नाही. शहरातील शासकीय रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, चांदणी चौक, विश्रामबाग चौक, काँग्रेस भवन या भागात वाहनतळच नाही. विश्रामबाग चौकात तर बेशिस्तपणे वाहने लावली जातात. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर विक्रेते, हातगाडीचालकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बहुतांश रस्ते अरुंद झाले आहेत. त्यात वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
शासकीय रुग्णालय चौकात तर नेहमीच वाहनांची गर्दी असते. जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील बाजू, इंदिरा भवन चौकात मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींसमोरच वाहने पार्क केली जातात. वाहनतळाची सुविधा नसल्याने नागरिकांनाही वाहन पार्क करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागते. त्यातच कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने पुन्हा नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. या साऱ्या प्रकारांमुळे वाहनधारकांत असंतोष वाढला आहे.