मैदान येईल, तेव्हा कुस्तीचे ठरवू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:57 PM2017-08-30T23:57:16+5:302017-08-30T23:57:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लांब आहेत. जेव्हा मैदान येईल, तेव्हा कसे लढायचे ते ठरवू, अशी प्रतिक्रिया खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीच आपली तयारी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, मी कोणाच्या वशिल्याने, कोणासाठी लाचारी करून या पदापर्यंत पोहोचलो नाही. स्वाभिमानानेच राजकारण केले आहे. त्यामुळे यापुढेही त्याचपद्धतीने मी राजकारण करणार आहे. पक्षांतर्गत संघर्षाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. माझे काम मी फक्त करीत आहे. कोणावर विनाकारण टीकाटिपणी करणार नाही. वेळ येते तेव्हा मी समोरूनच वार करतो. लपून वार करण्याचा माझा स्वभाव नाही. विधानसभा किंवा लोकसभा लढविण्याविषयी लोकच चर्चा करीत आहेत.
लोकसभेला लोकांनी माझ्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभेचीच तयारी मी करेन. तरीही या गोष्टीवर आताच बोलणे बरोबर नाही. कोणत्याही निवडणुकीचा निर्णय पक्षीय पातळीवर घेतला जातो. त्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करीत राहणार आहे.
अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहे. त्याबाबत आशावादी आहे. पक्षीय बैठकांना, कार्यक्रमांना कोण उपस्थित राहत आहे यापेक्षा, त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणे हे महत्त्वाचे आहे.
पतंगरावांची भेट राजकीय नव्हे
संजयकाका पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक भागातील नागरिकांनी मला निवडून दिले आहे. नागठाण्यातूनही मला मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. त्यामुळे कोणत्याही गावातील नागरिकांनी मला बोलावले, तर तेथे जाणे माझे कर्तव्य आहे. याच कर्तव्यभावनेने नागठाण्यातील बालगंधर्व पुरस्कार प्रदान सोहळ्यास उपस्थित होतो. पतंगराव कदम यांनी माझे व मीही त्यांच्या काही गोष्टींचे कौतुक केले. ज्यावेळी आमच्या दोघांमध्ये संघर्ष झाला, तेव्हा उघडपणे त्यांच्यावर मी आरोपही केले होते. त्यामुळे आमची भेट ही कार्यक्रमातून झालेली औपचारिकता होती. राजकीय भेट म्हणून त्याची चर्चा चुकीची आहे.