सदाभाऊंना संधी देताना भाजपाकडून विश्वासघात; माझ्या भानगडींची चौकशी करा - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 02:21 AM2017-08-20T02:21:27+5:302017-08-20T02:22:00+5:30
सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
सांगली : सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर संधी देताना भाजपाने विश्वासघात करून, त्यांच्या कोट्यातून अर्ज भरून घेतला, असा गौप्यस्फोट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत नसती, तर सदाभाऊ, तुम्हाला भाजपने विधानपरिषद आणि मंत्रिपदावर तरी ठेवले असते का? असा सवालही शेट्टी यांनी केला.
कृषी राज्यमंत्री खोत यांनी शुक्रवारी शेट्टींवर जोरदार टीका केली होती. त्या आरोपांचा शेट्टी यांनी समाचार घेतला.
शेट्टी म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाबरोबर आघाडी करताना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधानपरिषदेची एक जागा आणि एक मंत्रिपद देण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेसाठी आम्ही खोत यांच्या नावाची शिफारस केली. मात्र, विधानपरिषदेचा अर्ज भरताना भाजपाच्या नेत्यांनी विश्वासघात करून, भाजपाच्या चिन्हावर त्यांचा अर्ज भरून घेतला. त्यामुळेच सदाभाऊ सध्या डरकाळी फोडत आहेत. मंत्रिपदासाठी शेतकºयांचा तरी विश्वासघात करू नका. तुमच्याकडे थोडा जरी सन्मान असेल, तर संघटनेच्या जोरावर मिळविलेल्या मंत्रिपदावरून दूर व्हा. पुन्हा खुशाल मंत्री झाल्यास आमचा त्याला काहीच आक्षेप नसेल.
माझ्या भानगडींची चौकशी करा
माझा जन्मच शेतकरी कुटुंबात झाला आणि लहानाचा मोठाही शेतकरी चळवळीतच झालो. मी जर भानगडी, साखर सम्राटांबरोबर दलाली आणि संघटनेचा राजकीय ‘व्यवसाय’ केला असता, तर जिल्हा परिषद ते खासदार पदापर्यंत शेतकºयांनी मला कधीच संधी दिली नसती. शेतकºयांशी गद्दारी करणे आमच्या रक्तातच नाही. तरीही तुम्ही म्हणत असाल, तर भानगडींची सीआयडी चौकशी करून मला तुरुंगात टाका, असे आव्हान खा.शेट्टी यांनी सदाभाऊंना दिले.