महाडिक बंधूंचा पक्षप्रवेश कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 05:15 PM2019-11-20T17:15:42+5:302019-11-20T17:15:55+5:30
त्यातच नानासाहेब महाडिक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे थोरले बंधू म्हणून राहुल महाडिक यांनी एक पाऊल मागे घेत सम्राट महाडिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
अशोक पाटील ।
इस्लामपूर : शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी बंडखोरी केली. स्वबळावर त्यांनी पन्नास हजार मतांचा टप्पा सहज गाठला. त्यामुळे आगामी काळात पक्षीय ताकद मिळविण्यासाठी महाडिक बंधू काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
इस्लामपूर, शिराळा मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे भाजपची हवा निघून गेली. काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी कमळाला पसंती देऊन शिवाजीराव नाईक यांना दिलेली ताकद फोल ठरली. त्यामुळे शिराळा मतदार संघातील काँग्रेस शरीराने भाजपमध्ये असली तरी, मनाने मात्र काँग्रेसमध्येच आहे. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची पोकळी भरून काढण्यासाठी महाडिक बंधू काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या संपर्कात असल्याचे समजते.
इस्लामपूर-शिराळा मतदार संघातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पंखाखाली असणार आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांचे जयंत पाटील यांच्याशी सूत जुळत नाही. यामध्ये प्रामुख्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, इस्लामपूर पालिकेचे नगरसेवक वैभव पवार, पूर्वीचा काँग्रेसप्रेमी महाडिक गट यांचा त्यामध्ये समावेश आहे. हे सर्व नेहमीच जयंत पाटील यांच्याविरोधात राहिले आहेत. त्यामुळे इस्लामपूर व शिराळा मतदार संघात काँग्रेसला महाडिक बंधू ताकद देऊ शकतात, अशीही चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीअगोदर महाडिक बंधू भाजप किंवा शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. सम्राट महाडिक यांना शिराळा येथून भाजपची उमेदवारी द्यावी, ही त्यांची प्रमुख मागणी होती. तसेच इस्लामपुरातून शिवसेनेतून राहुल महाडिक हेही निवडणूक लढवण्यास तयार होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासूनच सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदार संघातून निवडणुकीत उतरण्याची तयारी केली होती. त्यातच नानासाहेब महाडिक यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे थोरले बंधू म्हणून राहुल महाडिक यांनी एक पाऊल मागे घेत सम्राट महाडिक यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आता सरकार स्थापण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सूत जुळले आहे. त्यामुळे महाडिक बंधू यांनी भाजपचा नाद सोडून शिवसेना किंवा काँग्रेसशी थेट संपर्क साधल्याचे समजते.