लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:13 PM2024-10-17T12:13:16+5:302024-10-17T12:14:30+5:30

शिवस्वराज्य यात्रेची सांगता  

When the Mahavikas Aghadi government comes, we will give better benefits to the sisters than this says Jayant Patil | लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

लाडक्या बहिणीला आणखी लाभ देऊ : जयंत पाटील; इस्लामपूर येथे मुसळधार पावसातही सभेला गर्दी

इस्लामपूर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर बहिणींना यापेक्षा आणखी चांगला लाभ देऊ. आमच्या माता, भगिनी आणि मुलींच्या केसाला धक्का लागणार नाही, असा कायदा बनवू. सामान्य नागरिकांचे जगणे सुसह्य आणि सुलभ होईल, अशा पद्धतीची धोरणे राबविण्यात येतील. त्यामुळे राज्यातील जनतेने महायुतीला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी महाविकास आघाडीला बळ द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

इस्लामपूर येथील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेची सांगता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी झाली. यावेळी पाटील बोलते होते. मुसळधार पाऊस पडूनही वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, बजरंग सोनवणे, आमदार सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, ‘युवक’चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, नागेश पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. मुली-महिला असुरक्षित आहेत. सत्तेत असणाऱ्या त्यांच्याच मित्रपक्षाच्या लोकप्रतिनिधीची पोलिस सुरक्षा असताना हत्या झाली. त्यावर सरकार काही बोलत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. युवकांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. राज्याला कर्जाच्या खाईत लोटून हे सरकार पैशांची वारेमाप उधळपट्टी करत आहे. सरकारच्या या सर्व कारनाम्यांचा पर्दाफाश आम्ही शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केला.

आमच्याकडे शरद पवार यांच्यासारखे खंबीर आणि लढवय्ये नेतृत्व आहे. राज्यातील जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर आजही विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता परिवर्तनाची लढाई जनतेच्या बळावर आम्ही जिंकणारच आहोत.

Web Title: When the Mahavikas Aghadi government comes, we will give better benefits to the sisters than this says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.