सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची डरकाळी केव्हा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:46 AM2019-08-01T00:46:56+5:302019-08-01T00:47:00+5:30
वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. ...
वारणावती : चांदोली, कोयना व दाजीपूर या अभयारण्याचा मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आहे. दरवर्षी व्याघ्र प्रकल्पात गणना होते. पण, गणनेत वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात वाघच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ताडोबातील वाघांची डरकाळी येथे कधी घुमणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्यातील वाघांची संख्या ३१२ असली तरीही, सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात वाघाचे अस्तित्व आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आता २०१९ मध्ये वाघांची संख्या ३१२ आहे. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले, त्याला यश आले आहे. वाघांच्या संख्येत अंदाजे ६५ टक्के वाढ झाल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या आकड्यांनुसार व्याघ्र संवर्धनात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र चांदोली, कोयना, दाजीपूर या तीनही अभयारण्य क्षेत्रात गेल्या चार वर्षांत एकाही वाघाचे अस्तित्व आढळून आले नाही. दरवर्षी व्याघ्र गणना करण्यात येते. पण वाघांचे अस्तित्व आढळून येत नाही, की मुद्दाम वन्यजीव विभाग माहिती देत नाही, हा प्रश्न आहे.
व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिक सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यास वन विभागाने प्राधान्य दिले आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील गावांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, या उद्देशाने ‘डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास’ योजना राबविली जात आहे. यामध्ये समाविष्ट गावांमध्ये जन, जल, जमीन आणि जंगल याची उत्पादकता वाढविण्यासोबतच मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये पायाभूत सुविधांसोबतच पर्यायी रोजगार संधी विकसित करून दिल्या जात आहेत.