सांगलीत एक झाड चोरीला जाते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:49 AM2021-03-04T04:49:06+5:302021-03-04T04:49:06+5:30
सांगली : शहरातील चंदनाचे झाड सोमवारी रात्री चोरीला गेले; पण या चोरीची तक्रार कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला. ...
सांगली : शहरातील चंदनाचे झाड सोमवारी रात्री चोरीला गेले; पण या चोरीची तक्रार कुठे करायची, असा प्रश्न निर्माण झाला. कारण तक्रारदारांनी दिवसभर पोलीस, वनविभाग आणि महापालिकेत हेलपाटे मारले. मात्र, साऱ्यांनीच हा विषय आपला नसल्याचे सांगत टोलवाटोलवी केली. चोरीची साधी दखल घेण्याची तत्परताही कुंभकर्णी प्रशासकीय यंत्रणेने दाखविली नाही. अखेर सायंकाळी पोलिसांनी तक्रार अर्ज दाखल करून घेतला आणि चौकशीसाठी बोलवू, असा निरोप दिला.
त्याचे असे झाले... बालाजीनगर येथील ‘संग्राम’ संस्थेच्या आवारात एक चंदनाचे झाड होते. हे झाड सोमवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेले. कटरच्या साहाय्याने जमिनीलगत बुंधा कापला. झाडाचा वरचा भाग, फांद्या मात्र तिथेच टाकून चोरट्यांनी बुंधा घेऊन पलायन केले. संस्थेचे सचिव शशिकांत माने सकाळी नऊला कार्यालयात आले असता त्यांना झाडाची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने संस्थेच्या प्रमुख मीना शेषू, सहकारी शांतीलाल काळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मीना शेषू यांनी पोलिसांत चोरीची तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार काळे व इतर सहकाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी हा विषय आपल्या अधिकारात येत नसून, वनसंरक्षक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी कुपवाडच्या वनविभागात जाऊन वनसंरक्षकांची भेट घेतली, तर त्यांनी महापालिकेच्या वृक्ष अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यास सांगितले. कुपवाडमधून सर्वजण महापालिकेत आले. त्यांनी महापालिकेचे वृक्ष अधिकारी शिवप्रसाद कोरे यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यांनी ही घटना चोरीची असल्याने पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला! आधीच दोन शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारून काळे व त्यांचे सहकारी थकले होते. आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पोलिसांत जाण्याची सूचना केल्याने त्यांना नेमके काय करायचे हेच समजेना. कोरे यांनी त्यांच्या तक्रार अर्जावर लेखी शेराही दिला. तीन कार्यालये फिरल्यानंतरही झाडाच्या चोरीची तक्रार नेमकी कुठे करायची, असा प्रश्न ‘संग्राम’च्या कार्यकर्त्यांना पडला होता.
पोलिसांत अर्ज
आधी पोलीस, नंतर वनविभाग आणि महापालिकेचे उंबरठे झिजवून कोणीच चोरीची तक्रार घेण्यास तयार नव्हते. अखेर सायंकाळी पुन्हा ‘संग्राम’चे कार्यकर्ते संजयनगर पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्यांचा चोरीचा तक्रार अर्ज स्वीकारला. चौकशीसाठी बोलवू, असे सांगत त्यांना निरोप दिला.