घनकचरा प्रकल्पाला मुहूर्त कधी?
By Admin | Published: March 20, 2017 11:42 PM2017-03-20T23:42:10+5:302017-03-20T23:42:10+5:30
आराखड्यास मंजुरीची प्रतीक्षा : मुदतीत काम पूर्ण होण्याबाबत शंका; सुधार समिती न्यायालयात जाणार
सांगली : महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी हरित न्यायालयाने डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदत दिली आहे. पण अद्याप या प्रकल्पाच्या आराखड्याला महासभेची मंजुरीच मिळालेली नाही. मार्च महिन्यात सर्वसाधारण सभाच झालेली नाही. आता २४ मार्च रोजी विशेष महासभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत केवळ पालिका अंदाजपत्रकावरच चर्चा होणार आहे. त्यामुळे आराखडा मंजुरी व त्यानंतरच्या निविदा प्रक्रियेत मे महिना संपणार आहे. उर्वरित सहा महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
मार्च महिन्यात महासभाच झाली नाही. आता २४ रोजी पालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत विशेष सभा घेतली आहे. त्यामुळे आता एप्रिल महिन्याच्या महासभेत प्रकल्प आराखड्यावर चर्चा होऊ शकते. या सभेत आराखड्याला मंजुरी मिळाली तरी, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास जून महिना उजाडणार आहे.(प्रतिनिधी)
काय आहे प्रकल्प आराखड्यात
समडोळी व बेडग येथील कचरा डेपोवरील साचलेल्या कचरा नष्ट करणे. दररोजचा सुमारे १८० टन कचऱ्याचे वर्गीकरण करून कंपोस्ट खत, इंधन तयार करणे आदींचा आराखड्यात समावेश आहे. आराखडा तयार झाल्यानंतर महापालिकेने तो हरित न्यायालयात सादर केला. हरित न्यायालयाने आराखड्याला मान्यता दिली. घनकचरा प्रकल्पाची कालमर्यादा निश्चित करून हमीपत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने हमीपत्र दिल्यानंतर या प्रकल्पात सशर्त मंजुरी दिली आहे. घनकचरा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१७ ही अंतिम डेडलाईन असेल. केवळ आपत्कालीन परिस्थितीत ही मुदत मार्च २०१८ पर्यंत असेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.