दुष्काळाच्या प्रश्नाकडे सरकार लक्ष कधी देणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2016 11:42 PM2016-06-09T23:42:13+5:302016-06-10T00:17:49+5:30
जयंत पाटील : दुष्काळी समस्यांवर सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
सांगली : जिल्ह्यातील दुष्काळाचा सामना करणाऱ्या तालुक्यातील ग्रामस्थांच्या, पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा एवढ्या दोनच माफक अपेक्षा असून, त्या पूर्ण करण्यातही शासनाकडून चालढकल सुरू आहे. विशेषत: जत तालुक्यात जनावरांचा जीव जाण्याअगोदर तिथे तातडीने चारा छावण्या सुरू करणे आवश्यक असून, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी बाहेर पडायला सांगा, अशा सूचना माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी गुरूवारी दिल्या.
आ. पाटील यांनी नुकताच दुष्काळी भागाचा दौरा पूर्ण केला. त्यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या समस्या व उपाय यावर चर्चा क रून तोडगा काढण्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविली होती. या बैठकीला सर्व प्रांत, तहसीलदार, त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीलाच आ. पाटील यांनी जत तालुक्यातील पाणीटंचाई व चाऱ्याचा प्रश्न बैठकीत मांडला. जत तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर असून यावर प्रशासन काही उपाययोजना करणार आहे का? असा सवाल करीत, जनावरांचा जीव जाण्याअगोदर तिथे चारा छावण्या सुरू करा, असे पाटील यांनी सांगितले. यावर, चारा छावणी मंजुरीचे अधिकार कॅबिनेटला असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय व्हायला हवा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. चारा छावणी सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणे अपेक्षित असताना, मंत्रीच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावर पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जत तालुक्यात दौरा करीत असताना तहसीलदारांविषयी व अधिकाऱ्यांविषयी नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले की, तहसीलदारांना बाहेर फिरायला सांगा. उमदी येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्याची सूचनाही यावेळी त्यांनी केली. यावर, तहसीलदारांना पाठवून उपोषण मागे घेण्यास सांगू, असे सांगताच जत तालुक्यातील नेत्यांनी, तहसीलदार नको, प्रांतांना पाठवा, अशी मागणी केली.
तासगाव तालुक्याचा आढावा घेताना नेहरूनगर येथील लोकांची जागा रितसर त्यांच्या नावावर करून देण्यात यावी असे सांगत, मतकुणकी येथील शेतकऱ्यांना मोबदला देण्याची सूचना त्यांनी केली. अग्रणी नदीत पाणी सोडण्यात यावे, सहा गावांसाठी एक तलाठी अशी परिस्थिती आहे, यावर तोडगा काढावा, वायफळे येथे १४ टॅँकर अपेक्षित असताना तिथे चार टॅँकरने पाणी पुरवठा होत आहे. टॅँकरमध्ये वाढ करावी, धनगाव पाणी योजना पुन्हा सुरू करावी, मोराळे तलावाची गळती काढावी आदी मागण्यांवर यावेळी चर्चा झाली.
आटपाडी तालुक्यातील समस्या मांडताना जयंत पाटील म्हणाले की, या तालुक्याला पैसे भरूनही टेंभूतून पाणी मिळाले नाही. सांगोल्यास पाणी देण्यात येत असताना, आटपाडी तालुक्यावर अन्याय का? हे असेच राहिले, तर दोन तालुक्यातील संघर्ष वाढेल, असेही ते म्हणाले. झरे येथे रमाई आवास योजनेची कामे होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे, जांभुळणी येथे असणाऱ्या बंधाऱ्यांची दारे पूर्ण बंद करण्यात यावीत, राजेवाडी येथील कालव्याचे काम पूर्ण करण्यात यावे, रोहयोच्या कामांना गती द्यावी आदी मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली.
यावेळी आमदार सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, उपाध्यक्ष रणजित पाटील, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, मनोज शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, अविनाश पाटील, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रवीण साळुंखे, वन अधिकारी समाधान चव्हाण, तहसीलदार रूपाली सरनोबत, किशोर घाडगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)