महाराष्ट्रातील कारखानदारांकडून शेतकऱ्यांची लूट थांबणार कधी?, संजय कोलेंचा सवाल
By अशोक डोंबाळे | Published: April 5, 2023 07:12 PM2023-04-05T19:12:53+5:302023-04-05T19:13:21+5:30
गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखान्यास ३५०० रुपयांपेक्षा जास्त दर द्यायला जमत असेल तर महाराष्ट्रातील भ्रष्ट कारखानदारांना का जमत नाही?
सांगली : गुजरात राज्यातील गणदेवी साखर कारखाना तोडणी व वाहतूक वगळता ३५०० रुपयांपेक्षा जास्त दर देत आहे. गणदेवी कारखाना व्यवस्थापनाला जमत असेल तर महाराष्ट्रातील भ्रष्ट कारखानदारांना का जमत नाही?, असा सवाल शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी सांगलीत केला. तसेच कारखानदारांशी लागेबंद असणाऱ्या संघटनेच्या पुढाऱ्यांनी एकरकमी एफआरपीचे तुनतून बंद करुन शेतकऱ्यांना जादा दर कसा मिळेल, असा विचार करावा, असा टोलाही त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना लगवला.
संजय कोले म्हणाले, दरवर्षी प्रमाणे गुजरातमधील सहकारी साखर कारखान्यांनी २०२२-२३ हंगामासाठी उच्चांकी ऊसदर जाहीर केला आहे. ऊस गळीत चालू असतानाच, मार्चअखेर आर्थिक वर्ष संपत असल्याने गुजरातमध्ये ऊसदर जाहीर केला जातो. गेली सोळा वर्षे गुजरातचे कारखाने ऊस दरात अव्वल राहिले आहेत. त्यांनी ऊस दराबाबत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जवळपास फिरकू दिले नाही. असे ऊसदर पाहता महाराष्ट्रातील कारखानदार भ्रष्टाचार करतात, संगनमताने शेतकऱ्यांना लुटतात व सरकार त्यांना पाठीशी घालते. हे सिद्ध होते.
चालू गळीत हंगामात गणदेवी येथील सहकारी साखर कारखान्याने ८ लाख ३८ हजार टन ऊस गाळप करुन ११.४७ टक्के उताऱ्याने ९ लाख ५७ हजार क्विंटल साखर उत्पादन केले. ऊस दरातून प्रति टन ७०० रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा करून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२२ व जानेवारी २०२३ साठी ३ हजार ४७५ रुपये तर फेब्रुवारी ३ हजार ५७५, मार्च ३ हजार ६७५ व एप्रिलसाठी ३ हजार ७७५ रुपये उच्चांकी ऊस दर देण्याचे जाहीर केले आहे. हा दर तोडणी व वाहतूक खर्च धरून प्रति टन ४ हजार १७५ ते ४ हजार ४७५ रुपये इतका होतो. गुजरात राज्यातील बहुतांशी साखर कारखाने दर चांगला देत असताना महाराष्ट्रातील साखर कारखाने काही संघटनांच्या नेत्यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
साखर उताऱ्यातून ही फसवणूक
देशातील सर्वाधिक साखर उतारा असणाऱ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात १२.८० टक्के पेक्षा जास्त रिकव्हरी असणारे कारखाने तीन हजार रुपये दर देताना कुरकूर करत आहेत. सध्या तर सर्वच कारखान्यांनी साखर उताराही चोरु लागले आहेत. यातूनही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, असेही कोले म्हणाले.