महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू होणार तरी कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:17 AM2021-06-27T04:17:53+5:302021-06-27T04:17:53+5:30
फोटो २६ संतोष ०१ : सांगली रेल्वेस्थानकात गाड्यांअभावी दिवसभर असा शुकशुकाट असतो. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन शिथिल ...
फोटो २६ संतोष ०१ : सांगली रेल्वेस्थानकात गाड्यांअभावी दिवसभर असा शुकशुकाट असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन शिथिल होताच जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरू झाली; पण रेल्वेला मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. लांब पल्ल्याच्या अवघ्या आठ एक्स्प्रेस सध्या आरक्षित प्रवाशांसाठीच धावताहेत. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू होणार तरी कधी, हा सवाल गंभीर बनला आहे.
मिरज आणि सांगलीतून दररोज हजारो प्रवासी देशभरात रेल्वेने प्रवास करतात. व्यापार, शिक्षण, नोकऱ्या यासाठी रेल्वेचा प्रवास महत्त्वाचा आधार ठरला आहे. मात्र, दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे प्रवासाचे चक्र ठप्प झाले आहे. दक्षिण व उत्तर भारतात जाण्यासाठी काही मोजक्याच गाड्या धावत आहेत. त्यामध्ये आरक्षण कन्फर्म असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येतो. अहमदाबाद, अजमेर, जोधपूर, दिल्ली, गोवा, पुद्दुचेरी, गोंदिया, तिरुपती आदी मार्गांवर एक्स्प्रेस धावत आहेत. राज्याअंतर्गत अनेक गाड्या मात्र अजूनही सुरू झालेल्या नाहीत. विशेषत: पुणे, मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी आरामगाड्या किंवा एसटीतून मुंबई गाठावी लागत आहे. जादा पैसे खर्च करावे लागत आहेत. लांब पल्ल्याच्या महत्त्वाच्या गाड्या सुरू करताना महालक्ष्मी एक्स्प्रेससारख्या महत्त्वाच्या गाडीकडे दुर्लक्ष झाले आहे.
बॉक्स
सध्या सुरू असणाऱ्या एक्स्प्रेस
गोवा-निजामुद्दीन
कोल्हापूर-गोंंदिया
मिरज-बेंलगुरू
कोल्हापूर-तिरुपती
यशवंतपूर-जोधपूर
यशवंतपूर-अजमेर
बेंगलोर-गांधीधाम
कोल्हापूर-निजामुद्दीन
बॉक्स
पॅसेंजर गाड्यांना मिळेना मुहूर्त
- पॅसेंजर गाड्यांना मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही. सांगली व मिरज स्थानकातून गेल्या दीड वर्षात एकही पॅसेंजर गाडी धावलेली नाही.
- कोल्हापूर-पुणे, सातारा-कोल्हापूर, मिरज-बेळगाव, मिरज-पंढरपूर व मिरज-कोल्हापूर या काही प्रचंड व बारमाही गर्दीच्या पॅसेंजर गाड्या बंदच आहेत.
- सातारा-कोल्हापूर पॅसेंजर बंद असल्याने प्रवाशांची कोंडी झाली आहे. सातारा व सांगली जिल्ह्यांतून दररोज अडीच हजारांहून अधिक प्रवासी व्यापार-उदीम, शिक्षण व नोकरीकामी या पॅसेंजरने कोल्हापूरला जातात.
बॉक्स
प्रवाशांना या गाड्यांची प्रतीक्षा
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी
कोल्हापूर-मुंबई कोयना
कोल्हापूर-बेंगलुरू राणी चेन्नम्मा
मिरज-सोलापूर
मिरज-परळी
सातारा-कोल्हापूर
मिरज-बेळगाव
मिरज-पंढरपूर
मिरज-कोल्हापूर
कोल्हापूर-पुणे
कोट
राज्यभरातील अनेक शहरांत लॉकडाऊन शिथिल होऊ लागले आहे, त्यामुळे रेल्वेने काही महत्त्वाच्या मार्गांवरील गाड्या सुरू करायला हव्यात. विशेषत: मुंबई, पुणे, सोलापूर मार्गांवर गाड्यांची प्रवाशांना प्रतीक्षा आहे.
- संदीप शिंदे, मिरज
सांगली व मिरजेतून कोल्हापूर, पुणे मार्गांवर पॅसेंजर गाड्या त्वरित सुरू कराव्यात. रेल्वेअभावी एसटी किंवा खासगी गाड्यांतून जादा पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे. नोकरदार, विद्यार्थ्यांची यामध्ये आर्थिक कुचंबणा होत आहे.
- संगमेश्वर दुधनी, प्रवासी