मराठा समाज भानावर येणार तरी कधी? - मनोज जरांगे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 02:25 PM2024-08-09T14:25:06+5:302024-08-09T14:25:27+5:30
सांगली : पाच पिढ्या गेल्या तरी नेत्याचा संसार का मोठा करताय? मराठा समाज भानावर कधी येणार? मराठ्यांची रग आणि ...
सांगली : पाच पिढ्या गेल्या तरी नेत्याचा संसार का मोठा करताय? मराठा समाज भानावर कधी येणार? मराठ्यांची रग आणि धग दाखविण्याची वेळ आली आहे. नेत्याला मोठे करण्यापेक्षा लेकराला अधिकारी करायला शिका, असे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सांगलीतील सभेत केले.
सांगलीत गुरुवारी सायंकाळी राम मंदिर चौकात सभा झाली. सभेसाठी जिल्हाभरातून मराठा बांधव उपस्थित होते. जिजाऊ वंदनेने सभेला सुरुवात झाली. आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
जरांगे म्हणाले, गेल्या अकरा-साडेअकरा महिन्यांपासून मराठ्यांचा एकजुटीने संघर्ष सुरू आहे. सांगलीतील मराठ्यांनी महाराष्ट्रातील सर्वांत मोठी निष्ठा दाखवली. मुसळधार पावसात ठाम राहिले. तुम्हाला आरक्षण देईपर्यंत मी गप्प बसणार नाही. मराठ्यांनी शेतात राबून पोरं शिकवली आहेत. लेकरू अधिकारी होण्याची आशा धरली आहे. त्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय पर्याय नाही. मराठ्यांच्या कष्टाचे मला चीज करायचे आहे. नेत्यांना आपले पक्ष मोठे करायचे आहेत; पण आपल्याला राजकारण करायचे नाही. आरक्षण मिळाले नाही तर मात्र पर्याय नाही. आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या पक्षातील मराठ्यांनी एक राहावे. २५ वर्षे पक्षांवर निष्ठा ठेवूनही घरातल्या पोराचे वाटोळेच झाले. आरक्षण नसल्याने नोकऱ्या नाहीत.
जरांगे म्हणाले, आपल्या मतांंवर नेते आमदार, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य होतील; पण यातून लाखो मराठ्यांचे वाटोळे करायचे आहे काय? त्यांच्याकडे बघून आपण मोठे होणार नाही. ओबीसींच्या आरक्षणासाठी एक भुजबळ आवाज उठवतोय; पण आपले १००-१५० असूनही उपयोगाचे नाहीत. आपला बोलायला माणूसच नाही. मी रस्त्यावर लढतो, विधानसभेत आपले ५० आमदार बोलू देत. तुम्ही भावनिक होऊ नका. इतर समाजांच्या लोकांनाही आपल्यामुळे आशा लागली आहे. फक्त पुढचे तीन महिने कष्ट करा, आयुष्याचे कल्याण होईल. आतापर्यंत पक्षांवर निष्ठा ठेवली, सांगेल त्याला मतदान केले; पण उपयोग झाला नाही. मराठ्यांनी फक्त स्वप्नेच पाहायची का? आरक्षण नाही म्हणून आत्महत्या झाली नसली पाहिजे.
जरांगे म्हणाले, आंदोलनानंतर गावोगावी कुणबी दाखले निघत आहेत. हे आंदोलनाचे यश आहे. आता सगेसोयरे आदेशाची प्रतीक्षा आहे. ओबीसीतून नेत्यांना आरक्षण मागा. ‘सत्ता आल्यावर देतो’ म्हटला, की समजायचे तो आपला नाही. एवढ्यावेळी आपल्या माणसाला पाठिंबा द्यायला सांगा. आपला उमेदवार उभा करायचे ठरले, तर ताकदीने निवडून द्या. विरोधकाला पाडायचे ठरले, तर ताकदीने पाडा. आपल्या समाजाचा उमेदवार पटत नसला तरी मतदान करा. बोगस मतदान बाहेर काढा. आमची सत्ता आली, तर इतर जातीधर्माचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मराठ्यांची असेल. गरज लागली तर पुन्हा मुंबईला जाऊ. आम्ही मुंबईला गेलो, तर त्यांना यावे लागेल.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या
जरांगे म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने त्यांना तातडीने भरपाई द्यावी, अन्यथा त्यासाठीही आंदोलन करावे लागेल. मराठा आरक्षणाचे आंदोलन संपल्यावर अलमट्टीलाही जाऊ.
भुजबळांमुळे आमदार पळायचे
जरांगे यांच्या सभेवेळी काँग्रेस भवनशेजारी एक विद्युत दुचाकी पेटली. उपस्थितांच्या नजरा तिकडे लागल्या. त्याचा उल्लेख करत जरांगे यांनी विचारणा केली, तिकडे छगन भुजबळ आलाय काय? त्याची काळजी करू नका. सोलापुरात देवेंद्र फडणवीस त्याला सोबत घेऊन आले होते. ज्या तालुक्यात त्याला न्यायचे, तेथील आमदार पळायचा.
फूट पाडायचे कारस्थान सुरु
जरांगे म्हणाले, फडणवीस यांनी दरेकरांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडायचे कारस्थान सुरू केले आहे. माझ्या गुडघ्याला सुद्धा लागत नाही, असा एकजण मुंबईतून येतोय. असले सारे भानगडबाज फडणवीस यांच्याकडेच आहेत. मराठ्यांनी त्यांच्याकडे पाहायला सुरुवात केली तर काय होईल? मराठ्यांनी निवडणुकीत पाडलेले सारे मागच्या दारातून आता गेले आहेत. त्यांना लोकसभेला हिसका दाखवला, आता विधानसभेलाही पाडूया. यावेळी सरकारमध्ये दोन चाके नसतीलच. आपण पुन्हा मुंबईला जाऊ. २९ रोजी देशातील सर्वांत मोठी बैठक अंतरवाली सराटीमध्ये घेतली जाईल.
फडणविस यांनी नोटीस पाठवायला सांगितली
जरांगे म्हणाले, ‘गेवराईतून मला नोटीस काढावी’ असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती मला आजच मिळाली. एसआयटीदेखील माझ्या मागे लागली आहे; पण मी समाजासाठी काम करत आहे. मला समाज मोठा करायचा आहे. मी मॅनेज होत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. छगन भुजबळांसोबत सारे ओबीसी एकत्र आले आहेत. मराठा समाजानेही एकत्र यावे. आरक्षण असणारे ओबीसी ताकदीने लढत आहेत, आपल्याला तर आरक्षणही नाही, त्यामुळे अधिक ताकदीने लढावे लागेल.