रुग्णांसाठी मोफत लॅबचे काम रेंगाळले, जागेविना घोडे अडले; सांगली शासकीय रुग्णालयातील प्रकल्प सत्यात उतरणार कधी?
By अविनाश कोळी | Published: November 29, 2023 04:40 PM2023-11-29T16:40:18+5:302023-11-29T16:40:31+5:30
अविनाश कोळी सांगली : शासकीय रुग्णालयात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रेडिओलॉजी प्रकल्प सुरू करण्यासाठी आदेश देऊन सव्वा वर्षाचा ...
अविनाश कोळी
सांगली : शासकीय रुग्णालयात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रेडिओलॉजी प्रकल्प सुरू करण्यासाठी आदेश देऊन सव्वा वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप सांगलीत नियुक्त कंपनीला जागा मिळू शकली नाही. गरीब रुग्णांना महागड्या चाचण्या मोफत मिळण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करूनही सांगली जिल्ह्यात केवळ जागेची चाचपणीच सुरू आहे.
रेडिओलॉजी प्रकल्पासाठी कृष्णा डायग्नोस्टिक लि. या कंपनीची नियुक्ती आरोग्य विभागाने केली आहे. या कंपनीमार्फत सांगली, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, सोलापूर, ठाणे, रायगड, कोल्हापूर, नाशिक, लातूर आदी जिल्ह्यांत ठिकठिकाणी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. काही ठिकाणी या प्रकल्पाला मुहूर्त लागला; मात्र सांगली जिल्ह्यासाठी मात्र या प्रकल्पाला अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून देण्यात अद्याप जिल्ह्याला यश मिळालेले नाही.
काय आहे प्रकल्प?
नियुक्त कंपनीमार्फत सीटी स्कॅन, एक्स-रे यासह पॅथालॉजी लॅब उघडली जाईल. या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल. कंपनीला त्यांच्या खर्चाची रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे.
कार्यादेश देऊनही विलंब
संबंधित कंपनीला शासनाच्या आरोग्य विभागाने १८ जुलै २०२२ रोजी कार्यादेश दिला होता. आदेश देऊनही सव्वा वर्षाचा काळ लोटला तरी हा प्रकल्प सांगलीत अस्तित्वात आलेला नाही. तरीही हा प्रकल्प अद्याप जिवंत आहे.
आज बैठक होणार
या प्रकल्पाच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जागेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कंपनीकडून सांगलीत पाहणी
नियुक्त कंपनीने या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयास भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली. थ्री फेज वीज कनेक्शन व जागा उपलब्धतेबाबत त्यांनी पाहणी केली. याबाबत निर्णय लवकर घेतल्यास करार करून कंपनी तातडीने हा प्रकल्प सांगलीत सुरू करण्याची तयारी करीत आहे.
शासनाने प्रकल्प मंजूर करूनही तो जर जागेसाठी रेंगाळत असेल तर हा प्रकार योग्य नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना या प्रकल्पातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच