रस्त्यांची कामे कधी सुरू करणार? : जयश्री पाटील यांचा अधिकाऱ्याना सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:13 PM2017-10-26T12:13:45+5:302017-10-26T12:19:13+5:30
दोन वर्षांपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरवेळी पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन प्रशासन देते. मग आतापर्यंत रस्त्यांची कामे का झाली नाहीत? ही कामे कधी सुरू करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्याना धारेवर धरले. येत्या दोन महिन्यांत २४ कोटींच्या रस्त्यांसह रखडलेली सर्व विकास कामे मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले.
सांगली : दोन वर्षांपासून महापालिका हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. दरवेळी पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन प्रशासन देते. मग आतापर्यंत रस्त्यांची कामे का झाली नाहीत? ही कामे कधी सुरू करणार? अशी प्रश्नांची सरबत्ती करीत काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्याना धारेवर धरले. येत्या दोन महिन्यांत २४ कोटींच्या रस्त्यांसह रखडलेली सर्व विकास कामे मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी दिले.
महापालिका क्षेत्रातील विकास कामांची आढावा बैठक श्रीमती पाटील यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीला महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, उपायुक्त सुनील पवार यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते. खड्डेमय रस्त्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत पाटील म्हणाल्या की, खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
खड्डयांभोवती दिवे लावून, रांगोळ्या काढून लोक आंदोलन करत आहेत. घरी येऊन मते मागायला आला होता, आता कामे का करत नाही? असा जाब अनेक नागरिक विचारत आहेत. या लोकांना काय उत्तरे द्यायची? रस्त्यांची कामे कधी सुरू करणार? असा जाब पाटील यांनी विचारला. त्यावर महापौर शिकलगार यांनी २४ कोटींचे रस्ते मंजूर झाले असून, ठेकेदार काम करत नसल्याचे सांगितले.
उपायुक्त सुनील पवार यांनी २४ कोटींच्या रस्त्यांच्या कामांच्या निविदा निघाल्या आहेत, वर्कआॅर्डरही दिली आहे. लवकरच ही कामे सुरू करू. हॉटमिक्स ठेकेदार असोसिएशनचे बाबा गुंजाटे म्हणाले, २४ कोटींमधील १६ रस्त्यांचे खडीकरण व मुरुमीकरण पूर्ण झाले आहे. या कामाची बिले दिल्यानंतर सर्वच रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही दिली.
जयश्री पाटील यांनी ठेकेदारांची बिले तातडीने अदा करण्याचे आदेश दिले. चार दिवसांत खडीकरण, मुरुमीकरणाची बिले अदा करून रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठेकेदार असोसिएशनचे अध्यक्ष सज्जन पाटील यांनी हॉटमिक्स ठेकेदारांबरोबरच लहान ठेकेदारांचीही बिले काढण्याची मागणी केली. बैठकीला नगरसेवक राजेश नाईक, दिलीप पाटील, प्रशांत पाटील, पाडुरंग भिसे, शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, गुलजार पेंढारी आदी उपस्थित होते.
आयुक्तांची बैठकीकडे पाठ
जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीकडे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यानी पाठ फिरविली होती. केवळ बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहर अभियंता, पाणी पुरवठा अधिकारी, नगररचनाकार, आरोग्य अधिकारी बैठकीला गैरहजर होते. उपायुक्त सुनील पवार व मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी हेही बैठकीला उशिरा आले. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनातील बेबनाव समोर आला.