जिल्ह्यातील दुसरी लाट संपणार तरी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:19 AM2021-07-18T04:19:57+5:302021-07-18T04:19:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना रुग्णांची स्थिर असलेली रुग्णसंख्या, मृतांची संख्याही कायम असताना शासनस्तरावरून तिसऱ्या लाटेच्या तयारीची सूचना ...

When will the second wave in the district end? | जिल्ह्यातील दुसरी लाट संपणार तरी कधी?

जिल्ह्यातील दुसरी लाट संपणार तरी कधी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोना रुग्णांची स्थिर असलेली रुग्णसंख्या, मृतांची संख्याही कायम असताना शासनस्तरावरून तिसऱ्या लाटेच्या तयारीची सूचना सुरू आहे. राज्यात एकीकडे दुसरी लाट ओसरल्याने तिथे तिसऱ्या लाटेबाबत दक्षता आवश्यक असली तरी जिल्ह्यात अद्याप दुसरीच लाट कायम असल्याने चिंता कायम आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दुसरी लाट संपण्याअगोदरच तिसरी लाट सुरू हाेण्याची शक्यता असल्याने लाट रोखायची असेल, तर नियमांचे पालन करणे नागरिकांच्याच हाती आहे.

राज्यातील बहुतांश भागांत कोराेनाची लाट ओसरली आहे. मात्र, जिल्ह्यातील स्थिती ‘जैसे थे’ आहे. मुळात जिल्ह्यात दुसरी लाट उशिराने सुरू झाल्याने ती ओसरतानाही उशीर होण्याची शक्यता असली तरी वैद्यकीय यंत्रणांनी मात्र त्याअगोरदच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यातच शासनस्तरावरून तिसऱ्या लाटेसाठी सज्जता ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यात दिवसाला हजार ते बाराशे रुग्णसंख्या कायम असली तरी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ चिंता वाढविणारी ठरत आहे.

नागरिकांच्या वर्तनामुळेही दुसरी लाट जिल्ह्यावर कायम आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाधितांच्या संपर्कात आलेेले इतर नागरिक काळजी घेत नसल्यानेही रुग्णसंख्येतील वाढ कायम आहे.

चौकट

तिसरी लाट येण्याची भीती

अशीच रुग्णसंख्या कायम राहिल्यास जिल्ह्यात दुसरी लाट ओसरण्याअगोदरच तिसरी लाट सुरू होण्याचीही भीती आहे. रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी ती स्थिर राहत असल्याने दुसरी लाटच तिसऱ्या लाटेत परावर्तित होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

चौकट

कम्युनिटी आयसोलेशनच प्रभावी ठरणार

जिल्ह्यातील दुसरी लाट थोपविण्यासाठी होम आयसोलेशनऐवजी कम्युनिटी आयसोलेशन हाच सध्याचा प्रभावी पर्याय ठरणार आहे. होम आयसोलेशनमध्ये तितक्या प्रमाणात काळजी घेतली जात नसल्याने कुटुंबातीलच अथवा संपर्कातील रुग्ण वाढत आहेत. ज्या ज्या गावांत बाधितांना वेगळे करण्यात आले त्या गावांनी कोरोनावर मात केली हा अनुभव असल्याने कम्युनिटी आयसोलेशनच एक मात्रा ठरणार आहे.

कोट

कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी असलेल्या नियमांचे नागरिकांनी योग्य पालन केल्यास लाट रोखली जाणार आहे. जिल्ह्यात दुसरी लाट उशिरा सुरू झाल्याने ओसरतानाही वेळ लागण्याची शक्यता आहे. मात्र, नागरिक जितक्या काळजीपूर्वक नियमांचे पालन करतील तितक्या लवकर लाट ओसरण्याची शक्यता आहे.

डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

कोट

दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या अद्याप कायम असली तरी ती कमी करण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना जनतेने साथ द्यावी. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली माहिती लवकर दिल्यास संसर्ग रोखू शकतो. त्यामुळे दुसऱ्या लाटेतून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी व कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.

डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: When will the second wave in the district end?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.