आचारसंहितेने अतिवृष्टीची मदत मिळणार कधी?; सांगली जिल्ह्यातील ११०२६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:00 PM2024-10-17T13:00:10+5:302024-10-17T13:00:48+5:30
२७५९१ शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
सांगली : जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील ११ हजार २६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण, जिल्ह्यातील २७ हजार ५९१ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळाली नाही. हे सर्व शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. ऑक्टोबरमध्येही मुसळधार पाऊस सुरूच असून ओढे, नाले, नद्या ओसंडून वाहत आहेत. जुलै महिन्यातील अतिवृष्टी, कृष्णा, वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांमध्ये भाजीपाला, पपई, सोयाबीन, भुईमूग, भात, हळद, मका, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मिरज, शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यांतील १६ हजार ९९९ शेतकऱ्यांचे सहा हजार १५९.२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी १० कोटी ९० लाख रुपयांच्या निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. पण, शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
पुन्हा ४१३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान
ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील आठ हजार ५४४ शेतकऱ्यांचे चार हजार १३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये फळपिक, ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वीचीच मदत मिळाली नसताना पुन्हा कोट्यवधी रुपयांचे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.