ऊस दर: सांगलीचे साखर कारखानदार तोडगा कधी काढणार?, निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 05:04 PM2023-11-24T17:04:33+5:302023-11-24T17:05:36+5:30

माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली

When will the sugar millers of Sangli solve the sugarcane price issue | ऊस दर: सांगलीचे साखर कारखानदार तोडगा कधी काढणार?, निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

ऊस दर: सांगलीचे साखर कारखानदार तोडगा कधी काढणार?, निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी ज्या कारखान्याची एफआरपी तीन हजारपेक्षा जास्त आहे त्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत आणि उर्वरित कारखान्यांनी प्रति टन ५० रुपये जादा शेतकऱ्यांना द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या तोडग्याची जिल्ह्यातील कारखानदार अंमलबजावणी करणार की वेगळा काय निर्णय होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपये मिळावेत. तसेच चालू गळीत हंगामासाठी येणाऱ्या उसाला प्रति टन तीन हजार ५०० रुपये दर मिळाला पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले होते. या आंदोलनानंतरही कारखानदारांनी दराची कोंडी फोडली नसल्यामुळे गुरुवारी पुणे ते बेंगलोर महामार्गावर कोल्हापुरातील शिरोळी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते.

या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत ज्या कारखान्यांनी प्रति टन तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिला आहे. त्या कारखान्यांनी प्रति टन १०० रुपये द्यावेत. तसेच उर्वरित कारखानदारांनी प्रति टन ५० रुपये द्यावेत, असा तोडगा निघाला आहे. या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोडगा काढणार की नाही, असा शेतकऱ्यांनी सवाल उपस्थित केला आहे.

कारखानदारांनी तोडगा काढला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कारखानदारांच्या भूमिकेकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागून राहिले आहे.

२६ नोव्हेंबरला बैठक

सांगली जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सर्व कारखानदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविले आहे, अशी माहिती स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली. या बैठकीत तोडगा निघणार की त्यापूर्वीच कारखानदार दराची कोंडी फोडणार, अशीही शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

Web Title: When will the sugar millers of Sangli solve the sugarcane price issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.