कुठे पंचरंगी, तर कुठे बहुरंगी अपक्षांची संख्या मोठी : प्रमुख राजकीय पक्षांसमोर उभे केले आव्हान-सांगली महापालिका निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:13 AM2018-07-19T01:13:22+5:302018-07-19T01:13:27+5:30
उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटपर्यंत रंगलेले नाट्य, इच्छुकांवर नेत्यांनी टाकलेला दबाव यामुळे, तसेच वरिष्ठ पातळीवरून फोना-फोनीमुळे अडीचशे अपक्षांनी माघार घेतली. तरीही पाच प्रभागातील काही गटात पंचरंगी, तर १५ प्रभागात बहुरंगी लढती
सांगली : उमेदवारी अर्ज माघारीसाठी शेवटपर्यंत रंगलेले नाट्य, इच्छुकांवर नेत्यांनी टाकलेला दबाव यामुळे, तसेच वरिष्ठ पातळीवरून फोना-फोनीमुळे अडीचशे अपक्षांनी माघार घेतली. तरीही पाच प्रभागातील काही गटात पंचरंगी, तर १५ प्रभागात बहुरंगी लढती होत आहेत.
सर्वच २० प्रभागात अपक्षांची संख्या मोठी असल्याने राजकीय पक्षांसमोर आव्हान आहे. अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासह सर्वसाधारण पुरूष गटात अपक्षांनी संख्या अधिक आहे.
अर्ज माघारीचे नाट्य संपल्यानंतर बुधवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप झाले. त्यानंतर सहाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली. एकूण ७८ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे सर्वाधिक ७७ उमेदवार असून त्याखालोखाल काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी ४५, राष्ट्रवादीचे ३२, जिल्हा सुधार समितीचे १५ व ५ पुरस्कृत, तर स्वाभिमानी विकास आघाडीचे ९ उमेदवार आहेत. याशिवाय बसप, माकप, मनसे, जनता दल, एमआयएम, भारिप, बहुजन मुक्ती पार्टी आदी पक्षांचे उमेदवारही रिंगणात उतरले आहेत. पण या पक्षांना दोनअंकी उमेदवारही मिळू शकलेले नाहीत. याउलट अपक्षांची संख्या १९४ इतकी आहे.
पाच प्रभागात पंचरंगी लढती होत आहेत. यामध्ये वसंतदादा कारखाना परिसरातील प्रभाग ११ मध्ये चारही गटात प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आघाडी, भाजप, शिवसेनेसह दोन अपक्ष मैदानात आहेत. मदनभाऊ पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग ९ मध्ये तीन गटात ५, तर खुल्या गटात ४ उमेदवार आहेत. प्रमुख पक्षांसह अपक्षांनी आव्हान उभे केले आहे. मिरजेत प्रभाग ६ मध्ये तीन गटात पाच, तर एका गटात ४, प्रभाग १८ मध्ये तीन गटात पाच, तर खुल्या गटात ८ उमेदवार नशीब अजमावत आहेत.
५सांगलीवाडीतील लढती : लक्षवेधी ठरणार
सांगलीवाडीतील प्रभाग १३ मध्ये तीन जागा असून, त्यात ओबीसी गटात तिरंगी लढत आहे, तर सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरूष गटात चौरंगी लढत होत आहे. या दोन्ही गटात काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसह अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पाटील, भाजपचे अजिंक्य पाटील, राष्ट्रवादीचे हरिदास पाटील यांच्यात चुरस आहे.
सर्वाधिक उमेदवार प्रभाग ३ मध्ये
मिरजेतील प्रभाग तीनमध्ये चारही गटात मोठी चुरस आहे. या प्रभागात सर्वाधिक उमेदवार रिंगणात आहेत.
पक्षनिहाय उमेदवार संख्या
भाजप - ७७, काँग्रेस ४५, शिवसेना ४५, राष्ट्रवादी ३२, सुधार समिती १५, स्वाभिमानी विकास आघाडी ९, मार्क्सवादी २, बहुजन समाज पार्टी ७, मनसे २, जनता दल ६, एमआयएम ८, रासप १, भारिप बहुजन महासंघ ६, बहुजन मुक्ती पार्टी २, अपक्ष १९४, एकूण ४५१