सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 03:28 AM2019-08-02T03:28:00+5:302019-08-02T03:28:06+5:30
पक्ष सोडणाऱ्यांना फटकारले; राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ
इस्लामपूर (जि. सांगली) : काही लोक सोडून गेले, त्याची चिंता नाही. कामे होत नाहीत, अशा सबबी काहींनी सांगितल्या. मात्र सत्ता असो वा नसो, कामे करायची दृष्टी पाहिजे. सत्ता नसली तरी कामाशी बांधिलकी असेल, तर लोकांचा पाठिंबा मिळतोच, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना फटकारले. राजारामबापूंच्या विचाराने पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
येथील राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विद्यार्थी नेते कन्हैया कुमार, माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे, राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदींच्या उपस्थितीत झाला. पवार म्हणाले की, राजारामबापूंनी उद्योग आणि वीजमंत्री असताना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा पाया भक्कम केला. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम केले. जनता पक्षात गेल्यावर त्यांनी प्रभावी विरोधक म्हणून काम करुन दाखवले. आज देशात आणि राज्यात सत्तेचा गैरवापर होत आहे. जातीपातीवरुन माणसांवरच हल्ले होत आहेत. संकट बाजूला करुन देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्वांनी संघटित झाले पाहिजे.
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बापूंच्या रक्तात काँगे्रस होती. त्यानंतर ते जनता पक्षात गेले तरी, आम्ही सर्वांनी मिळून समाजवादी विचारधारा भक्कम करण्याचे काम केले. कन्हैया कुमार म्हणाले की, इंग्रजांना पळवून लावताना जितके कष्ट पडले, त्यापेक्षा अधिक प्रयत्न आणि कष्ट भाजपला पळवून लावताना करावे लागणार आहेत. बापूंच्या विचारांचे बोट धरुन बलशाली हिंदुस्थानची उभारणी करावी लागेल. जयंत पाटील म्हणाले, बापूंनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले. राजकारणात चांगले-वाईट दिवस येतात. मात्र संकटात साथ
देतो, तो खरा कार्यकर्ता, ही बापूंची शिकवण आम्ही कायम ठेवली आहे.