पाया खोदताना शेजारची भिंत कोसळून मजूर ठार, सांगलीतील गव्हाण येथे घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:17 PM2022-12-03T13:17:10+5:302022-12-03T13:17:38+5:30
घराची भिंत कोसळून तीन मजूर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले.
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथे नवीन घरासाठी पाया खोदत असताना बाजूच्या घराची भिंत कोसळून नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथील तीन मजूर दगड-मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले. नंदकुमार ऊर्फ नंदू आबा लोखंडे (वय ५०) यांचा तासगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. शुक्रवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. अन्य दोघा जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गव्हाण येथील वज्रचौंडे रस्त्यालगत शेरीमळा भागात गट नंबर ७५ मध्ये पांडुरंग भगवान जाधव यांची जागा आहे. शुक्रवारी सकाळी त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी पाया खाेदण्याचे काम सुरु होते. या जागेच्या बाजूलाच अशोक रामचंद्र जाधव व बालक रामचंद्र जाधव यांचे दगडमातीच्या भिंती असलेले घर आहे. नंदकुमार ऊर्फ नंदू आबा लोखंडे, पिंटू अशोक सकट (वय ३८), मायाप्पा राजाराम ढाले (वय ३२) यांच्यासह काही मजूर येथे पायासाठी जमीन खोदत होते.
काम सुरु असताना अशोक जाधव व बालक जाधव यांच्या घराची भिंत अचानक कोसळली. नंदू लोखंडे, पिंटू सकट, मायाप्पा ढाले हे तिघेही दगड-विटांच्या ढिगाऱ्याखाली सापडले. जाधव यांनी तत्काळ त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने ढिगाऱ्यातून बाहेर काढले. गंभीर जखमी असलेल्या नंदू लोखंडे यांना तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयीन सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. अन्य जखमी पिंटू सकट व मायाप्पा ढाले यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास हवालदार भारत माने करीत आहेत.
तहसीलदारांची भेट
घटनास्थळी तासगावचे तहसीलदार रवींद्र रांजणे यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्तरीय प्रशासनास योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.